कर्तव्यदक्ष ! पोलीस अधीक्षकांवर फेकलेला भाला अंगरक्षकाने स्वतःच्या पाठीवर घेतला, गंभीर जखमी

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन –  होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी म्हण प्रचलित आहे. नांदेडात धुळवडीच्या दिवशी अशाच काहीसा प्रत्यय आला आहे. पोलिस अधीक्षकांच्या दिशेने फेकलेला भाला त्यांचा अंगरक्षकांने आपल्या पाठीवर घेत त्यांचे प्राण वाचवले. मात्र मोठ्या पात्याचा भाला अंगरक्षकाच्या बरगाडीपर्यंत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दिनेश रामेश्वर पांडे असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. सध्या ते पोलिस दलात नाईक या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कर्तव्य निष्ठेमुळेच पोलिस अधीक्षकांनी त्यांची अंगरक्षक म्हणून नेमणुक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील सचखंड गुरुद्वारातून दरवर्षी धुळवडीच्या दिवशी हल्लाबोल मिरवणूक काढली जाते. परंतु यंदा लॉकडाऊनमुळे मिरवणुकीला परवानगी दिली नव्हती. तरी देखील 29 मार्च रोजी सायंकाळी गुरुद्वारात अरदास झाल्यानंतर बॅरीकेट तोडून मिरवणुक मुख्य रस्त्यावर आली. यावेळी हातात उघडी शस्त्रे घेवून 400 ते 500 तरुणांचा जत्था पोलिसांच्या दिशेने आला. दिसेल त्या पोलिसांवर हातातील शस्त्राने वार करण्यात येत होते. त्याचवेळी प्रवेशद्वार क्रमांक एक वर पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे त्यांचा अंगरक्षक दिनेश रामेश्वर पांडे आणि पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे थांबले होते. त्यावेळी पोलिस अधीक्षक शेवाळे आणि चिखलीकर हे जमावापासून बाजूला होत असताना अंगरक्षक पांडे यांनी दोघाना वाचविण्याचा प्रयत्न करत त्यांना कव्हर करत होता. तोच जमावातील एकाने पोलिस अधीक्षकांच्या दिशेने भाला फेकला. क्षणातच तो भाला पांडे यांच्या पाठीत घुसला. मोठ्या पात्याचा भाला पांडे यांच्या बरगडीपर्यंत पोहचला होता. रक्तबंबाळ होत पांडे जमीनीवर कोसळले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्यांच्या पाठीवर तब्बल 50 टाके पडले आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.