पती-पत्नी आणि प्रेयसीमध्ये झाली तडजोड, पत्नीने ‘या’ आधारावर दिली सोबत राहण्यास परवानगी

भोपाळ : वृत्तसंस्था – वैवाहिक संबंधाच्या गुंतागुंतीवरून एक चित्रपट आला होता, ज्याचे नाव ’जुदाई’ होते. यामध्ये पत्नीने एक कोटी रुपये घेऊन पतीला प्रेयसीकडे सोपवले होते आणि घटस्फोट घेऊन त्यांचे लग्नही लावून दिले होते. अशाच प्रकारचे प्रकरण भोपाळच्या कुटुंब न्यायालयात आले आहे. यामध्ये सुद्धा पतीपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या प्रेयसीकडून सुमारे सव्वा कोटी रूपयांची संपत्ती घेऊन पत्नीने आपल्या पतीला तिच्या सोबत राहण्याची परवानगी दिली आहे. याबाबत एक तडजोडसुद्धा झाली आहे. प्रेयसीने 60 लाख रुपये किमतीचा डुप्लेक्स, 27 लाख रुपये रोख आणि एक प्लॉट प्रियकराच्या पत्नीच्या नावावर केला आहे. आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की, दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीने कौटुंबिक न्यायालयात कौन्सिलर सरिता राजानी यांच्याकडे आपल्या आई-वडीलांमध्ये समेट घडवण्यासाठी विनंती केली होती.

कौन्सिलरनुसार, प्रेयसी 54 वर्षांची आहे आणि तिचा जोडीदार असलेल्या 42 वर्षांच्या पुरूषाशी तिचे आठ वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. या महिलेच्या पतीचा मृत्यू झालेला आहे. प्रियकरसुद्धा विवाहित आहे आणि त्याला 16 आणि 12 वर्षांचा दोन मुली आहेत. महिलेने जेव्हा प्रियकराकडे त्याच्या घरात सोबत राहण्याचा हट्ट धरला तेव्हा दाम्पत्यामध्ये वाद सुरू झाला आणि तो वाढत गेला. दाम्पत्याच्या मुलीच्या विनंतीनंतर कौन्सिलरने दाम्पत्याचे अनेक टप्प्यात समुपदेशन केले. यानंतर प्रेयसी, प्रियकराच्या पत्नीला आपल्या आयुष्यभराची संपत्ती देण्यास तयार झाली.

दुसर्‍या महिलेला ठेवणे पत्नीला नव्हते पसंत
कौन्सिलिंगमध्ये पतीने म्हटले की, त्याला दोघींना सोबत ठेवायचे आहे, परंतु पत्नीची यास मंजूरी नव्हती. पतीने म्हटले की, मुलींसाठी पत्नीला सोडू शकत नाही आणि प्रेयसीपासून सुद्धा वेगळा होऊ शकत नाही. त्याने म्हटले की, त्याला प्रेयसीची सोबत चांगले वाटते.

प्रेयसीने संपत्ती देण्याचा ठेवला प्रस्ताव
कौन्सिलिंगच्या दरम्यान प्रेयसीने म्हटले की, ती सोबत राहण्यासाठी प्रियकराच्या पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी आणि मुलींच्या भविष्यासाठी आपल्या आयुष्यभराची कमाई देण्यास तयार आहे. तिने प्रियकराच्या पत्नीसमोर हा प्रस्ताव ठेवला आणि तिने तो स्वीकारला. प्रेयसीने आपली सुमारे सव्वा कोटीची संपत्ती तडजोडी अंतर्गत प्रियकराच्या पत्नीच्या नावावर केली.

पत्नीने त्रास न देण्याचे केले मान्य
दाम्पत्याची मुलगी आई-वडीलांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी माझ्याकडे आली होती, परंतु पुरुष, प्रेयसीशिवाय राहण्यास तयार नव्हता, यासाठी त्याच्या प्रेयसीसोबत पत्नीने तडजोड केली. हिंदू विवाह कायद्यांतर्गत घटस्फोटाशिवाय दुसर्‍या महिलेसोबत तो विवाह करू शकत नाही, परंतु पत्नीच्या सहमतीने तो कुणाच्याही सोबत राहू शकतो. पत्नीने त्रास न देण्याचे सुद्धा मान्य केले आहे.

-सरिता राजानी, कौन्सिलर, कौटुंबिक न्यायालय, भोपाळ