शिवसेना खासदाराची नवनीत राणांना धमकी, म्हणाले -‘तू महाराष्ट्रात कशी फिरते तेच बघतो’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अमरावतीच्या खासदार नवनीर राणा यांनी आज शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर आरोप केला आहे. अरविंद सावंत यांनी आपल्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. सभागृहाच्या बाहेर एका वृत्तवाहिनीशी बोलताना राणा यांनी शिवसेनवर चांगलेच तोंडसुख घेतले. यापूर्वी देखील शिवसेनेकडून आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे राणा यांनी सांगितले.

यापूर्वी नवनीत राणा यांना, ज्या चेहऱ्यावर तू घमंड करते तो चेहरा अ‍ॅसिड टाकून विद्रूप करुन टाकू अशी धमकी मिळाली होती. या प्रकरणाने राज्यात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता खासदार अरविंद सावंत यांनी राणा यांना धमकी दिली आहे. तू महाराष्ट्रात कशी फिरते तेच बघतो, आता तुला देखील तुरुंगात टाकू अशी धमकी दिल्याचे नवनीत राणा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, दिल्ली पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिला खासदाराला सभागृहाच्या आत धमकावणे कितपत योग्य आहे, असा सवाल करत त्यांनी हा माझा अपमान नसून देशातील महिलांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून शिवसेना हवेत गेली आहे. त्यांना वाट्टेल तसे वागत आहेत. कुणालाही जेलमध्ये टाकत आहेत. त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. परमबीर सिंह, मनसुख हिरेन प्रकरणावरुन हे सिद्ध होते. मी त्यांचे काळे धंदे सभागृहासमोर मांडत असल्याने गुंदागर्दी सुरु केली आहे. आज तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी हद्दच केली आहे. माझ्या बाजूने जाताना त्यांनी मला धमकी दिली. असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

यानंतर तुमचा नंबर आहे, आता तुम्हाला जेलमध्ये टाकणार, तुम्हाला बाहेर फिरणे मुश्कील करु टाकू, अशी धमकी अरविंद सावंत यांनी दिल्याचे खासदार राणा यांनी सांगितले. तसेच तुमचे पती तथा आमदार रवी राणा यांनासुद्धा ज्या पद्धतीने आम्ही अन्य लोकांशी वागतो, तशाच पद्धतीने त्यालाही वागणूक दिली जाईल. तुम्हाला फिरण्याच्या लायकीचे सोडणार नाही, अशी धमकी यापूर्वी पत्रातून देण्यात आली असल्याचे राणा यांनी सांगितले.