आचरेकरांच्या असन्मानाबद्दल सरकारने माफी मागावी : नवाब मलिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रमाकांत आचरेकर सरांना पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवले होते. मग त्यांचे अंत्यसंस्कार सरकारी इतमामात का झाले नाहीत? त्यांना दिलेल्या असन्मानाबद्दल फडवणवीस सरकारने माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. सचिन तेंडुलकर यांचे गुरू आणि अनेक क्रिकेटर घडविणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांवर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार न झाल्याने सध्या सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.

नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, रमाकांत आचरेकर हे भारतातील एकमेव असे क्रिकेट प्रशिक्षक होते ज्यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी त्याच तोडीचे एकाहून एक उत्तम क्रिकेटपटू घडवले. आचरेकरांना पद्मश्री हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार २०१० मध्ये प्राप्त झाला होता. त्यामुळे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणे अभिप्रेत होते.

आचरेकरांना दिलेल्या असन्मानाबद्दल फडवणवीस सरकारने माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. दरम्यान, पद्मश्री असूनही त्यांचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत साधेपणाने झाल्यामुळे क्रिकेटप्रेमींसह राजकीय स्तरावरूनही सरकारला धारेवर धरण्यात येत आहे.