नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदास कडकडून विरोध

गडचिरोली: पोलीसनामा ऑनलाईन

गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यानी ठिकठिकाणी पोस्टर लावून १० मे रोजी बंद पुकारला होता, मात्र या बंदला गडचिरोली जिल्ह्यातील गावक-यांकडून कडाडून विरोध करण्यात आला. इतकेच नव्हे तर नक्षलवाद्यांनी २०१५ साली जारावंडी येथील गजानन मडावी यांचा निर्घृण खून केला होता. येथील गावकऱ्यांनी आज बंदच्या निमित्ताने गजानन मडावी यांच्या स्मरणार्थ व नक्षलवाद्यांच्या निषेधार्थ एकत्र येत त्यांचे स्मारक उभे केले. त्याचबरोबर नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी लावलल्या बॅनर्सची वेगवेगळ्या ठिकाणी गावकऱ्यांनी एकत्र येत होळी केली. हा बंद यशस्वी व्हावा याकरिता नक्षलवाद्यानी रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे तोडून टाकली होती, पण गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही झाडे बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत केली.

कवितेच्या माध्यमातून विरोध

नक्षलवादी कृत्याला सर्व नागरिक कंटाळले आहेत. हे नक्षलवादी म्हणजे गावक-यांच्या विकासाला अडथळा ठरतात ,शासकीय योजना आदिवास्यांपर्यंत पोहचू देता नाहीत यामुळेच स्थानिक लोकांकडून बंदला विरोध करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता या नक्षलवाद्यांची गाठ आमच्याशी आहे असे तेथील एका आदिवासी युवकाने कवितेच्या माध्यमातून सांगितले.

हा बंद नक्षलवादी अक्षरश: आमच्यावर लादत आहेत, आमचा जगण्याचा हक्क हिरावून घेत आहेत.नक्षलवादी सूडाच्या भावनेतून आदिवासींवर अत्याचार करत असून त्यांचा नाहक खून करत आहेत.त्यांनी हे त्वरीत थांबवावे अन्यथा आम्हा गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होईल अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त करत नक्षलवाद्यांविरोधात घोषणा दिल्या.