NCP Leader Eknath Khadse | एकनाथ खडसे यांचा मोठा दावा, ”महाविकास आघाडीला ३५ ते ४० पेक्षा जास्त जागा मिळतील”

जळगाव : NCP Leader Eknath Khadse | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) राजकीय पक्षांच्या जागवाटप आणि उमेदवार निश्चितीसाठी हालचाली सुरू आहेत. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरूद्ध महायुती अशी थेट लढत आगामी निवडणुकीत होणार आहे. नुकत्याच आलेल्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

एकनाथ खडसे यांनी म्हटले की, आमही ४५ जागा जिंकणार असा दावा महायुतीने केला आहे. मग ३ जागा कुणासाठी सोडल्या माहिती नाही. अलीकडच्या काळात आलेला सव्र्हे पाहिला तर महाविकास आघाडीला जास्त जागा आणि महायुतीला कमी जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यानुसार महाविकास आघाडीला ३५ ते ४० पेक्षा जास्त जागा लोकसभा निवडणुकीत मिळतील.

एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) म्हणाले, रावेर मतदारसंघाची लोकसभा जागा राष्ट्रवादीला मिळावी असा आमचा आग्रह आहे. रावेर मतदारसंघासाठी मी इच्छुक असून पक्षानेही येथून लढण्यास सांगितले आहे. तब्येतीचे कारण असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ. महाआघाडीच्या माध्यमातून मी या जागेवर लढण्यास इच्छुक आहे. ही जागा आम्ही जिंकून आणू.

विरोधकांना टोला देताना खडसे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात सर्व विरोधक आणि मी एकटा असे चित्र वारंवार दिसते. याचा अर्थ नाथाभाऊला विरोध करावा असे सर्व सत्ताधारी पक्षांना वाटते. नाथाभाऊला व्यक्तिगत विरोध करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. शेतकरी आत्महत्या, विकासाच्या दृष्टीने जे प्रश्न आहेत त्यावर अधिक लक्ष घाला.

महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत एकनाथ खडसे म्हणाले, मविआमध्ये जागावाटपाचा तिढा नाही. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पुढील १५ दिवसांमध्ये जागांचा निर्णय होईल. राष्ट्रवादीने जास्तीत जास्त जागा जिंकाव्या असा आमचा प्रयत्न आहे. आगामी वर्ष निवडणुकांचे असल्याने यश मिळवण्याचा संकल्प आहे.