नीरेत मंगळवारपासून जनता कर्फ्यू दरम्यान आठ दिवस गांव संपुर्णपणे राहणार बंद ; आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय,

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन –  पुरंदर तालुक्यातील नीरा येथील बाजारपेठेत परिसरातील नागरिक गर्दी करीत असल्यामुळे कोरोना सक्रीय रूग्णांची संख्या सतत वाढू लागली त्या पार्श्वभुमीवर आपत्ती व्यवस्थापन समितीने नीरा गावात मंगळवार (दि.१८) पासून आठ दिवस कडक जनता कर्फ्यू पाळून कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी पञकार परिषदेत दिली.

जिल्हा प्रशासनाने नुकतेच कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्यासाठी नीरा परिसरातील गावे हाय अलर्ट व नीरा गांव अलर्ट म्हणून घोषित केेेेले. नीरा गावांत परिसरातील नागरिक गर्दी करीत असल्याने कोरोना सक्रीय रूग्णांची संख्या ९७ झाली. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीची नीरा ग्रामपंचायतीत शनिवारी (दि.१५) तातडीची बैठक झाली. त्यामध्ये मंगळवारी १८ मे ते मंंगळवार २५ मे या आठ दिवसांकरिता कडकडीत जनता कर्फ्यू पाळून बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जि.प.सदस्य विराज काकडे, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, प्रमोद काकडे, सुनिल चव्हाण, संदीप धायगुडे, मुनीर डांगे, अनंता शिंदे, नीरा पोलिस दुरक्षेञाचे फौजदार कैलास गोतपागर , सहा.फौजदार सुदर्शन होळकर, पोलिस शिपाई राजेंद्र भापकर, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर, स्थानिक पञकार आदी उपस्थित होते.

राजेश काकडे म्हणाले की, नीरा गावात जनता कर्फ्यू दरम्यान आरोग्य विभागाामार्फत संशयित कोरोना रूग्णांचा शोध घेण्यासाठी अँक्शन प्लँन तयार करण्यात येणार असून कोरोनाबाधित आढळलेल्या रूग्णांना पुढील उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात येणार आहे. जनता कर्फ्यू दरम्यानच्या कडक निर्बंधाचे व्यापा-यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर पोलिसांमार्फत कडक कारवाई होणार आहे.

दरम्यान, जनता कर्फ्यू दरम्यान दुध सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत सुरू राहणार असून किराणा, भाजीपाला, मटण, मासे, चिकन यांची दुकाने संपुर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच बँका, पतसंस्था, राज्य उत्पादन शुल्क याविभागाशी पञव्यवहार करून ही अस्थापने बंद ठेवण्याकरिता सुचना देण्यात येणार असल्याचे राजेश काकडे यांनी सांगितले.

जनता कर्फ्यूमध्ये दुकाने उघडी आढळल्यास मोठी कारवाई करणार – फौजदार कैलास गोतपागर

निरा गावांत १८ मे ते २५ मे दरम्यान कडक जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून रस्त्यावरील तसेच गल्ली बोळातील सर्व प्रकारची लहान दुकाने उघडी आढळल्यास अशा दुकानदारांवर १८८ कलमानुसार मोठी कारवाई करून तहसिलदारांकडे दुकाने सील करण्याकरिता प्रस्ताव दाखल करणार असल्याचा इशारा नीरा पोलिस दुरक्षेञाचे फौजदार कैलास गोतपागर यांनी दिला आहे.तसेच दुचाकी, चारचाकी वाहने विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसल्यास ती वाहने जप्त करण्यात येणार असल्याचे गोतपागर यांनी सांगितले.