नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाले – ‘निराश अवस्थेत पक्ष सोडणार होतो, पण…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मोदी सरकारमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री असलेले नितीन गडकरी हे भाजपचे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील प्रमुख नेते आहेत. यापूर्वी ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. कट्टर भाजपा कार्यकर्ते असलेल्या गडकरींच्या मनात देखील एकेकाळी पक्ष सोडण्याचा विचार आला होता. स्वत: गडकरी यांनीच एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे.

देशातील विविध विद्यापीठाच्या कुलगुरुशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नितीन गडकरींनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला आहे. गडकरी म्हणाले की, मी 1980 च्या दशकात विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपात आलो होतो. अटलजी निवडणूक हरले होते. आमच्या पक्षाची अवस्था बिकट होती. मोठ्या पराभवानंतर अटलजी,अडवाणींना काही भविष्य नाही, भाजपाला काही आधार नाही, अशी टीका होत होती. त्यावेळी मी खूप निराश झालो होतो. तुम्हाला या पार्टीत काही भविष्य नाही. लवकर पक्ष बदला, असा सल्ला मला अनेकांनी दिला होता. मी काही झाले तरी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. पण लोक ज्या पद्धतीने सल्ले देत आहेत. ते ऐकल्यावर कधी – कधी त्यांचे मत बरोबर असल्याचे वाटत होते, असे गडकरींनी सांगितले. अशावेळी आयआयटीमध्ये शिकलेल्या आणि सध्या अमेरिकेत राहणाऱ्या एका मित्राने मला पुस्तक दिले, त्या पुस्तकातील एका वाक्याने आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आयुष्यावर आधारित हे पुस्तक होते. माणूस कधीही युद्ध हरल्यानंतर संपत नाही, तो युद्धभूमी सोडतो तेंव्हा संपतो या वाक्याने आपल्याला प्रेरणा मिळाली. श्रीकृष्णाने अर्जुनाला देखील हाच उपदेश केला होता. ही लढाई न्यायाची आहे. धर्माची आहे. कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तुला ती लढावीच लागेल. यामध्येच समाजाचे हित आहे. देशाचे हित आहे. तुझ्या भविष्याचे हित आहे. याच वाक्याने पक्ष सोडण्याचा निर्णय बदलल्याचे गडकरी यांनी सांगितले.