Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख ‘पार’

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 110 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 46 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (गुरुवार) शहरामध्ये सहा कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 110 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 14 वर पोहचली आहे. आज 46 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 96 हजार 444 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेला रुग्ण पिंपरी, दापोडी, नेहरुनगर, वडमुखवाडी, आंबेगाव, नारायणगाव येथील रहिवासी आहे. आतापर्यंत शहरात 2563 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1804 शहरातील तर 759 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 582 रुग्ण अॅक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 82 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 97 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.