आक्षेपार्ह सेल्फी, ब्लॅकमेलिंग अन्‌ गैरवर्तन ; स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संचालकाविरुद्ध तक्रार दाखल 

नागपूर :  पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संचालकाविरुद्ध विद्यार्थिनीने धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह सेल्फी काढून त्याच्या मदतीने विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून गैरवर्तन करणे यासाठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल भुसारी असे आरोपीचे नाव असून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करतो.

राहुलचे नेताजी फुलमार्केट येथील जानकी कॉम्प्लेक्‍सच्या दुसऱ्या माळ्यावर बी. एस. एज्युकेशन इन्स्टिट्यूट असून, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करतो. अभ्यासासाठी येणाऱ्या मुलींसोबत तो जवळीक साधायचा. तसेच २६ मे ते २३ नोव्हेंबरपर्यंत त्याने विद्यार्थिनींसोबत जबरदस्तीने फोटो काढले. हे फोटो दाखवून तो विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करायचा. विवाहित विद्यार्थिनींनी त्याला इशारा देत लांब राहण्याचा इशारा दिला. संतापलेल्या भुसारीने आक्षेपार्ह फोटो पतीला पाठविण्यासह व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या विद्यार्थिनींनी क्‍लासला येणेही बंद केले. परंतु, तो कॉल करून क्‍लासला बोलावू लागला. त्याची मुजोरी वाढतच होती. सदर प्रकाराला वैतागून  विद्यार्थिनीने धंतोली ठाणे गाठून तक्रार दिली.

विद्यार्थ्याची कॉलर पकडून कार्यालयात डांबले

नागपूर : कामासाठी रेल्वेस्थानकावर आलेला विद्यार्थी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यातील वाद वाढल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्याने कायदा हातात घेऊन कॉलर पकडून विद्यार्थ्याला कार्यालयात डांबल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दिल्ली येथे होणाऱ्या कार्यशाळेसाठी शहरातील एका महाविद्यालयाचे विद्यार्थी जात आहेत. रेल्वेकडून त्यांना तिकिटात कन्सेशन देण्यात येते. कन्सेशन बुकवर त्यासाठी नोंदणी करावी लागते. नोंदणीनंतर माहितीची तपासणी मुख्य बुकिंग पर्यवेक्षक कार्यालयातून करावी लागते. ही प्रक्रिया करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी भावेश चव्हाण आपल्या चार मित्रांसोबत नागपूर रेल्वेस्थानकावर आला. कन्सेशन बुकवरील काही नोंदीबाबत अधिकाऱ्याने शंका घेतल्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद वाढल्यानंतर संबंधित रेल्वे अधिकाऱ्याने भावेशला कॉलर पकडून कार्यालयात डांबले, असा आरोप भावेश आणि त्याच्या मित्रांनी केला आहे. रेल्वेचे अधिकारी मात्र संबंधित अधिकाऱ्याची बाजू घेत आहेत.