पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एकाची 3 लाखाची फसवणूक

मेहकर : पोलीसनामा ऑनलाइन – पैसे दुप्पट (Double Money) करुन देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील सिंहगड रोड येथील एकाची तीन लाखाची आर्थिक फसवणूक (cheat) करणाऱ्या टोळीच्या (Gang) मेहकर पोलिसांनी (Mehkar Police) मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून आरोपींकडून रोख तीन लाख (three lakh) रुपयांसह दोन चारचाकी असा एकूण नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.12) करण्यात आली.

शेख चांद शेख अफजल (वय-38), प्रदीप परशराम डोंगरे (वय-33 दोघे. रा. जानेफळ), दीपक हरिभाऊ राठोड (वय-32 रा. पारडी), रहीम खा माजीद खा पठाण (वय-32 रा. उटी), संतोष सुखदेव जाधव (वय-25 रा. घुटी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी लोणार न्यायालयाने सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी शेख चांद शेख अफजल याच्यावर यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, अकोल्यातील समाजवादी पक्षाचे नेते मुकीम अहमद व साखरखेर्डा येथील शेख शफी कादरी यांच्या दुहेरी हत्याकांडातील तो आरोपी आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एमएच 04 जीजे 8339 आणि एमएच 12 एफपी 3367 या क्रमांकाची दोन वाहने आणि रोख तीन लाख रुपये जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रोडवर राहणाऱ्या शहाजी वसंत (वय-46) यांची शेगाव येथे दर्शनासाठी आले असता शेख चांद याच्यासोबत आमडापूर येथे ओळख झाली होती. त्यातून त्याने शहाजी वसंत यांना पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखविले होते. शहाजी हे शुक्रवारी नातेवाईकांसह तीन लाख रुपये घेऊन सुलतानपूर येथे आले. तेथे शेख चांदने त्यांना एका शेतात नेत त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन पलायन केले. ज्या वाहनाने त्याने पलायन केले त्या वाहनासह अन्य एक वाहन समृद्धी महामार्गाच्या जवळ सापडले. या प्रकरणी शहाजी वसंत यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रात्रीच गुन्हा दाखल करुन आरोपींना बेड्या ठोकल्या.