कामायनी संस्थेतर्फे विद्यार्थी-पालकांसाठी ऑनलाइन उन्हाळी शिबिर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गोखलेनगर येथील कामायनी संस्थेच्या वतीने ११ जून २०२१पर्यंत शाळा व कार्यशाळांमधील विद्यार्थी व पालकांसाठी ऑनलाईन उन्हाळी शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये १५ शिक्षक व ७ निदेशक असे एकूण २२ जण सहभागी होऊन पालक -विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

या शिबिरामध्ये मास्क बनविणे, विशेष मुलांचा लोगो त्या मास्कवर प्रिंट करणे, कापडी पिशव्या बनविणे, जुन्या वह्यांमधील कोरे पानांची वही किंवा रायटिंग पॅड बनविणे, ग्रीटिंग कार्ड्स बनविणे, क्राफ्ट वस्तूंपासून तोरण, फुलांच्या माळा बनविणे, विविध प्रकारचे सरबत बनविणे, खऱ्या फुलांची रांगोळी काढणे, कोशिंबीर बनवणे, टाकाऊपासून बाहुली बनविणे, निवडक गाणी व गोष्टी, मनिपर्स बनविणे, फ्रुटसॅलड डेकोरेशन, ओरोगामी फोटोफ्रेम, विविध प्राणी व पक्षी यांचे मुखवटे बनविणे, टिशू पेपरची फुले बनविणे, खेळांच्या माध्यमातून व्यायाम, मराठी व हिंदी गाणी अंताक्षरी, शेवयाची खीर बनविणे, क्रेप कागदाची फुले बनविणे, जेली व फ्लोटिंग कॅडल बनविणे, लोकरीपासून वॉल हँगिंग बनविणे, मातीच्या वस्तू बनविणे, ग्रीटिंग कार्ड बनविणे व रंगभूषा यासारखे विविध उपक्रम आहेत.

कामायनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुलकर्णी, कार्याध्यक्ष डॉ. आशुतोष भूपटकर, कार्यकारी विश्वस्त श्रीलेखाताई कुलकर्णी, व्यवस्थापक कालिदास सुपाते, प्राचार्या सुजाता आंबे यांच्या प्रेरणेने शिबीर घेण्यात आले आहे. गुगल मीटवर दररोज सकाळी ११ ते १२ या वेळेत शिबीर सुरू आहे. या शिबिरामध्ये शाळा व कार्यशाळेतील २५० विद्यार्थी व त्यांचे पालक सहभागी आहेत.