राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे हात इतिहास घडवतात : साध्वी ऋतुंभराजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  राममंदिर ते राष्ट्र मंदिर अशा श्रद्धानिधी जनजागर अभियानानिमित्त रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे साध्वी ऋतुंभराजी यांची जाहीर सभा पार पडली. सियावर रामचंद्र की जय, ‘पवनसुत हनुमान की जय’ ‘जय श्रीराम’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमला होता. “संकल्पासमोर विकल्प नसेल तर संकल्प नक्की सिद्धीस जातो. आपल्या पूर्वजांनी राष्ट्रनिर्माणासाठी संघर्ष केला. तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या विखारी वृत्तीने राममंदिराच्या चळवळीची थट्टा केली. आस्थांचा उपहास केला गेला. अशा वृत्तीला विरोध करण्याचे सामर्थ्य आपल्यात हवे. भविष्यात मंदिर उध्वस्त करण्याचे स्वप्नही कोणी पाहू शकणार नाही,” अशा शब्दांत साध्वी ऋतुंभराजी यांनी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे हात इतिहास घडवतात, हेही त्यांनी अधोरेखित केले.

साध्वी ऋतुंभराजी यांनी ‘भारत माता की जय, अखंड भारत की जय’ च्या घोषणेने सुरुवात केली. त्या म्हणाल्या, ‘कोणत्याही गोष्टीत सातत्य खूप महत्वाचे असते. आपल्या पूर्वजांनी प्राणांच्या वातीने संघर्षाचा दिवा अखंड तेवत ठेवला. आपण राजनैतिक गुलामी सहन केली, मात्र मनातील आशावाद संपू दिला नाही, शत्रूचे तळवे चाटले नाहीत. पूर्वजांचे शौर्य आणि धैर्यामुळे आपल्याला हे यश पहायला मिळाले आहे. आताच्या शिक्षणातून आपल्या मुलांना स्वाभिमान शिकता येईल का, असा प्रश्न आहे. मुलांना आंतरिक शक्ती देण्याचे काम पालकांचे आहे. मुलांवर स्वाभिमानाचे, राष्ट्रनिर्माणाचे संस्कार मातृशक्तीने केले पाहिजेत.’

देश निश्चित सीमांमध्ये बांधलेला आहे. देश राजशक्तीने चालतो, मात्र राष्ट्र आस्थेच्या प्रवाहाने चालते. हिंदूंच्या आस्थेची कायम खिल्ली उडवली गेली. वेब सिरीजमधून आस्थांचा उपहास केला जातो. चित्रपट, मालिकांमधून आपला निश्चय मोडण्याचा प्रयत्न केला जातो, थट्टा केली जाते. मात्र, आपला निश्चय इतका तकलादू नाही. सत्य सुर्यासारखे प्रकाशमान असते. ते कोणीच झाकू शकत नाही. मध्ययुगातील वाईट काळ परत येणार नाही, याची व्यवस्था आपण करायला हवी.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘राम मंदिर निर्माणाची चळवळ ही अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन झाले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर राममंदिर उभे राहत आहे.’

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या येथील भव्य मंदिर निर्माण श्रद्धानिधी अभियानानिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, रवींद्र वंजारवाडकर, ह.भ.प. शिवाजी मोरे, पांडुरंग राऊत, संजय मुद्राळे, तुषार कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. अभियानप्रमुख तुषार कुलकर्णी यांनी राममंदिराच्या ऐतिहासिक लढ्यावर प्रकाश टाकला.