Pune : …म्हणून आता ‘कोरोना’तून बरे झालेल्या पुण्याच्या ग्रामीण भागातील रूग्णांची होणार तपासणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा प्रशासनाने म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसच्या प्रकरणावर गांभीर्याने लक्ष दिले आहे. त्यानुसार, आरोग्य अधिकाऱ्यांना ग्रामीण भागांत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. याबाबतच्या सूचना काल (रविवार) जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागांत आरोग्य विभागांना 15 एप्रिलनंतर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची यादी तयार करून 24 ते 27 मे दरम्यान म्युकरमायकोसिसच्या संभावित प्रकरणांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. म्युकरमायकोसिस हा एक दुर्मिळ आजार आहे. जो कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत आहे. पुण्यात म्युकरमायकोसिसचे आत्तापर्यंत 300 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत.

जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिलेल्या आदेशात म्हटले की, तपासणीदरम्यान जर म्युकरमायकोसिसचे संभावित प्रकरणे समोर आली तर आजाराचे निदान होईपर्यंत रुग्णांना आवश्यक औषधे द्यावीत आणि उपचार आणि सर्जरीसाठी पुढे पाठवण्यात यावे. तसेच ज्या तालुक्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तिथे अतिरिक्त डॉक्टरांची नियुक्ती केली जावी.

दरम्यान, म्युकरमायकोसिसच्या उपचार आणि औषधोपचारासाठी समान वितरण आणि त्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्युकरमायकोसिसने आत्तापर्यंत 90 जणांचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सांगितले होते. आता हा एक चिंतेचा विषय बनला आहे.