पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाकडून ‘या’ कुख्यात दहशतवाद्याची सुटका करण्याचे आदेश

इस्लामाबाद : वृत्तसंस्था

अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लच्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या दहशतवादी अहमद उमर शेख याची सुटका करण्याचे आदेश पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने सिंध सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. पर्लच्या हत्येत आपली कमी भूमिका असल्याचे उमरने कोर्टात सांगितले. यापूर्वी सिंध कोर्टाने पर्लची हत्या करणाऱ्या अहमद उमर शेखसह फहाद नसीम, सईद सलमान साकिब आणि शेख मोहम्मद आदिल यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते.
1999 मध्ये एअर इंडियाचे विमान अपहरण केल्यानंतर भारताने उमर शेख या दहशतवाद्याची  सुटका केली होती. यानंतर तो पाकिस्तानात वास्तव्यास होता. 2002 मध्ये अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल याचे अपहरण करुन त्याची हत्या केली. यापूर्वी सिंध हायकोर्टाने या दहशतवाद्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते. अमेरिकेच्या दबावानंतर सिंध सरकारने या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील केले होते.
उमर शेखने 18 वर्षे तुरुंगात शिक्षा भोगली
उमर शेख आणि इतर दहशतवद्यांची सुटका करण्यामगे आयएसआयचा हात असल्याची चर्चा आहे. याआधी 2 एप्रिल 2020 मध्ये हायकोर्टाने 18 वर्षाच्या शिक्षेनंतर दहशतवाद्यांच्या याचिकेनंतर शेख, साकिब आणि नसीम यांची मुक्तता केली. तर शेखला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करुन सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच वीस लाखांचा दंड ठोठावला. उमरने 18 वर्षे तुरुंगात काढल्याने त्याची सात वर्षाची शिक्षा पूर्ण झाली आहे. कोणताही गुन्हा नसताना तुरुंगात ठेवणे चुकीचे असल्याचे कोर्टाने म्हटले. डॅनियल पर्ल हे वॉल स्ट्रीट जर्नलचे दक्षिण आशिया ब्युरोचे प्रमुख होते.
पाकिस्तानी ISI चा डाव असल्याचा संशय
उमेर शेख आणि इतर दहशतवाद्यांना सोडण्यात पाकिस्तानच्या आयएसआयचा डाव असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका सध्या कोरोनामुळे हैराण असल्याने इतर देशांमध्ये हस्तक्षेप करणार नाही, असे आयएसआयला वाटत आहे. तसेच सध्या लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि जैशचा म्होरक्यावर अमेरिकेचे लक्ष आहे. त्यामुळे ते पाकिस्तानच्या एफएटीएफच्या ग्रे यादीतून बाहेर येऊ शकत नाहीत.
उमरची सुटका केली तर त्याचा उपयोग भारत विरोधी कारवायांमध्ये करता येईल असे आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराला वाटत असल्याचे बोलले जात आहे. 1994 मध्ये परदेशी पर्यटकांचे अपहरण  केल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्याला अटक केली होती. मात्र, 1999 मध्ये एअर इंडियाचे विमान अपहरण केल्यानंतर सुटका करण्यात आलेल्या दहशदवाद्यांमध्ये उमरचा देखील समावेश होता.