ग्रामपंचायत निवडणूकीत गणित जुळवताना पॅनेल प्रमुखांची दमछाक

थेऊर – ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजल्यानंतर गाव पातळीवर वातावरण हळूहळू तापू लागले असून पूर्व हवेलीतील गावामध्ये पॅनेल प्रमुखांची गणिते जुळवताना दमछाक होत आहे. आपले उमेदवार कोण असावेत हे विरोधकानी दिलेल्या उमेदवारांवर ठरविले जात आहेत त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत अनुभवास येत आहे.

ऑगस्ट – 2020 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर गेली पाच महिने प्रशासक कार्यरत आहेत परंतु एका प्रशासकावर पाच ते सात ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे हे दिव्य पार पाडताना चांगलीच दमछाक होत आहे कोरोना महामारीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडणार असे वाटत असताना राज्य शासनाने राज्यातील चौदा हजारांवर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला.यासाठी काही ठिकाणी सरपंच पदासाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ण केली परंतु नंतर सर्व राज्यातील सरपंच पदांचे आरक्षण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर घेतले जाणार हे जाहीर केल्याने सर्वच राजकीय गणित बदलली.

पूर्व हवेलीतील लोणी काळभोर थेऊर कुंजीरवाडी आळंदी म्हातोबा उरुळी कांचन या गावात निवडणूकीची धामधूम सुरु झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांचे रुसवे फुगवे दूर करताना स्थानिक नेत्यांना चांगली कसरत करावी लागते आहे.परंतु खरी रंगत दि.4 जानेवारी नंतर येईल कारण त्या दिवशी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.त्यानंतर केवळ नऊ दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत.अनेक ठिकाणी तुल्यबळ लढती होणार हे निश्चित आहे