काय सांगता ! होय, शिपायाच्या फक्त 13 पदांसाठी आले तब्बल 27 हजार 671 अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. हरियाणामध्ये बेरोजगारीचा प्रश्न किती गंभीर आहे हे दाखवणारी ही घटना आहे. पानीपतमधील एका न्यायालयात फक्त 13 शिपायांच्या पदासाठी तब्बल 27671 तरुणांनी हजेरी लावली आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा फक्त 8 वी पास असणे गरजेचे आहे. मात्र या पदासाठी पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांनी देखील अर्ज केले असून भरतीसाठी रांग लावली होती. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.

हरियाणामध्ये बेरोजगारीची समस्या मोठी आहे. क श्रेणीतील भरतीसाठी उच्चशिक्षित तरुणही अर्ज करताना दिसत आहेत. त्यामुळेच अवघ्या 13 पदांसाठी 27 हजार 671 जणांनी अर्ज केला आहे. शिपायाच्या पदासाठी एमए, बीटेक, बीएससी आणि हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या तरुणांनी अर्ज केला आहे . बेरोजगारी प्रचंड असल्याने नोकरी मिळाली तर कुटुंबावरील आर्थिक भार कमी होईल अशी अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केली आहे. सुमारे 3 हजार अर्जदारांना तपासणीसाठी आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले होते. अर्ज विचाराधीन घेण्याआधी सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाते. कागदपत्र उपलब्ध नसतील तर अर्ज रद्द केला जातो. 23 फेब्रुवारीपर्यंत अर्जांच्या छाणणीचे काम केले जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.