संसदेचे अधिवेशन 29 जानेवारीपासून, 1 फेब्रुवारीपासून सादर होणार ‘बजेट’

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Parliament Session) 29 जानेवारीपासून सुरू होईल. अधिवेशनात 1 फेब्रुवारीला संसदेत आर्थिक वर्ष 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला जाईल. दोन भागात चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन 8 एप्रिलपर्यंत चालेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliament Session) पहिला टप्पा 29 जानेवारीपासून सुरू होईल आणि 15 फेबु्रवारीपर्यंत चालेल, तर दुसरा भाग 8 मार्च ते 8 एपिलपर्यंत चालेल.

लोकसभा सचिवालयाच्या वक्तव्यानुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद 29 जानेवारीला 11 वाजता संसदेची दोन्ही सभागृहे लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता सादर केला जाईल.

संसदेच्या स्थायी समितीला विविध मंत्रालये आणि विभागांच्या अनुदानाच्या मागण्यांवर विचार करणे सोपे बनवण्यासाठी 15 फेब्रुवारीला अधिवेशनाचा पहिला टप्पा स्थगित करण्यात येईल आणि 8 मार्चपासून दुसर्‍या टप्प्याची सुरूवात होईल. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कोविड-19 शी संबंधित सर्व दिशानिर्देशांचे पालन केले जाईल.

विशेष म्हणजे कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन मोदी सरकारने रद्द केले होते. सरकारने म्हटले होते की, कोरोनाची वाढती प्रकरणे पहाता यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाणार नाही. यावर विरोधकांनी आरोप केला की, सरकार शेतकर्‍यांचे आंदोलन आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यापासून दूर पळण्यासाठी अधिवेशन रद्द करत आहे.