SSR Death Case : CBI लवकरच ‘या’ 5 साक्षीदारांची करू शकते चौकशी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) टीम लवकरच पाच महत्त्वाच्या साक्षीदारांची चौकशी करू शकते. यापूर्वी मुंबई पोलिसांच्या पथकाने सर्वोच्च न्यायालयात सीलबंद लिफाफ्यात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यामध्ये पाच साक्षीदारांचे तपशीलवार वर्णन केले होते. प्रतिज्ञापत्रानुसार, सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच जेव्हा मुंबई पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा हे पाच लोक तिथे उपस्थित होते, ज्यांना या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. त्यामुळे या पाच जणांचे म्हणणे नोंदविल्यानंतर सीबीआय पुढील कारवाई करेल, असा अंदाजही वर्तविला जात आहे. मुंबई पोलिसांनी कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात रिया चक्रवर्ती, मिठू सिंह, सिद्धार्थ पीठानी, सॅम्युअल मिरांडा आणि आणखी एका साक्षीदाराचे नाव आहे. अशा परिस्थितीत सीबीआय लवकरच या पाच साक्षीदारांची चौकशी करू शकते.

मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 14 जून रोजी सुशांत सिंहच्या आत्महत्येची बातमी समजताच पोलिस पथक रात्री दोनच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांनी पाहिले की सुशांतचा मृतदेह फासावरून खाली उतरविण्यात आला असून बेडवर ठेवण्यात आला होता आणि हे पाच लोक घटनास्थळी उपस्थित होते. पोलिस पथकानेही या पाच जणांना फटकारले की तुम्ही पोलिस येण्याची वाट का नाही पाहिली? तुम्ही हे करायला नको होते. पण, पाचही लोक म्हणाले की सुशांत श्वास घेत असावा असे वाटल्यामुळे खाली उतरवले, जेणेकरून अशा परिस्थितीत सुशांतचा वेळेवर उपचार झाल्यास तो जगू शकेल.

आणखी एक बहीण मिठू सिंहचे नावही आले समोर
मुंबई पोलिसांच्या या सिद्धांतानुसार पहिल्यांदाच सुशांतच्या चार बहिणींपैकी एक असलेल्या मिठू सिंहचे नाव समोर आले आहे. यापूर्वी फरीदाबाद येथे राहणाऱ्या एका मोठ्या बहिणीचे नाव समोर आले होते जी सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधी मुंबईत त्यांच्या घरी राहून गेली होती. त्यांना लहान मुले देखील आहेत, ज्यांना सोडून ती सुशांतकडे आली होती. मात्र सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये देखील याचा उल्लेख केला आहे. पण, त्या एफआयआरमध्ये मिठू सिंहबद्दल कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही.

अ‍ॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट अन्वये एफआयआर
14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या पथकाने ‘अ‍ॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट’ अन्वये एफआयआर नोंदविला होता. त्यांच्या मते, या प्रकरणाची चौकशीही सुरू आहे. तथापि, सीआरपीसीच्या कलम 174 नुसार, हे अप्राकृतिक मृत्यूच्या कलमांतर्गत पाहिले जाऊ शकते. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 56 जणांचे निवेदन मुंबई पोलिसांनी नोंदवले आहे.