खुशखबर ! ‘कोरोना’ कवच पॉलिसीमध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचार्‍यांना 5 % सूट देणार कंपन्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) विमा कंपन्यांना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना कवच प्रीमियमवर पाच टक्के सूट देण्यास सांगितले आहे. पॉलिसीच्या अटींनुसार रुग्णालयाने विमा असलेल्या व्यक्तीच्या कॅशलेस उपचारांना नकार देऊ नये, हेही सुनिश्चित करण्यास नियामकाने सांगितले आहे.

आयआरडीएच्या सूचनेनुसार, सर्व ३० साधारण आणि आरोग्य विमा देणार्‍या विमा कंपन्यांनी कोविड-केंद्रित आरोग्य पॉलिसी ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. त्याला कोरोना कवच म्हणतात. आयआरडीएने प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, ‘कोरोना विषाणूविरूद्ध मोहिमेत आरोग्य क्षेत्राचे योगदान पाहता विमा कंपन्या डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना कवचसाठी पाच टक्के सूट देतील.’

दुसर्‍या निवेदनात आयआरडीएने म्हटले की, काही अहवालात रुग्णालये कोविड-१९ रुगांना विमा पॉलिसी असूनही उपचारासाठी ‘कॅशलेस’ सुविधा पुरवत नाहीत, असे म्हटले आहे. नियामकने सांगितले की, पॉलिसीधारक संबंधित विमा कंपनी/ टीपीएच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये ‘कॅशलेस’ उपचार घेण्यास पात्र आहेत. आयआरडीएने विमा कंपन्यांना पॉलिसीच्या अटीनुसार विमा असलेल्या व्यक्तीच्या कॅशलेस उपचारांना नकार देऊ नये हे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.

आता जाणून घेऊया ‘कोरोना कवच’ पॉलिसीची माहिती-

काय आहे कोरोना कवच पॉलिसी?
आयआरडीएच्या सूचनेनुसार, बऱ्याच विमा कंपन्यांनी कोरोना कवच पॉलिसी बाजारात आणली आहे. ५० हजार ते ५ लाखपर्यंत कव्हर असलेल्या या पॉलिसीचा प्रीमियम ४४७ रुपयांपासून सुरू होत आहे.

इतका असेल कालावधी
विमा नियामक आयआरडीएने सर्व कंपन्यांना कोविड-१९ च्या उपचारासाठी विशेष विमा पॉलिसी आणण्याचे निर्देश दिले होते. त्याचा कालावधी ३.५ महिने ते ९.५ महिने असेल आणि संक्रमित व्यक्तीला घरी उपचारांसाठी झालेल्या कर्जाचा क्लेम देखील दिला जाईल.

रुग्णालयाचा खर्च देखील असेल समाविष्ट
एचडीएफसी अर्गोने म्हटले की, सरकारी केंद्रांवर तपासणीत संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रूग्णालयाचा खर्च या पॉलिसीमध्ये समाविष्ट असेल. संक्रमणापासून प्रभावी असलेल्या इतर रोगांचा आणि रुग्णवाहिकांचा खर्च देखील समाविष्ट असेल, ज्यात १४ दिवस घरी उपचार दिले जातील.

जाणून घेऊया तुमच्यासाठी कोणता प्लॅन स्वस्त असेल…

इतका असेल प्रीमियम
प्रीमियम ४४७ रुपये ते ५,६३० रुपये आणि जीएसटी असेल, असे बजाज आलियान्झने सांगितले. रूग्णालयाच्या दैनंदिन रोख खर्चासाठी पर्यायी कव्हरदेखील असेल, ज्याचे प्रीमियम ३ ते ६२० रुपये आणि जीएसटी असेल. ३५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीस ५० हजारांपर्यंतची पॉलिसी ४४७ रुपये आणि जीएसटीच्या प्रीमियमवर मिळेल. सर्व प्रीमियम पूर्णपणे जमा केले जातील आणि त्यांचे दर देशभरात समान असतील.

स्वस्त पडेल फॅमिली प्लॅन
मॅक्स बूपा हेल्थ इन्शुरन्सचे एमडी-सीईओ कृष्णन रामचंद्रन म्हणाले की, आमच्या किंमती खूप स्वस्त आहेत. ३१-५५ वर्षांच्या व्यक्तीला केवळ २,२०० रुपयांच्या प्रीमियमवर २.५ लाख रुपयांचा कव्हर दिला जात आहे.

दोन प्रौढ आणि एका मुलाचा एकत्र विमा काढल्यास प्रीमियम ४,७०० रुपये असेल. म्हणजे एकत्र कुटुंबाचा विमा केल्यास प्रीमियम स्वस्त पडेल. आयसीआयसीआय लोम्बार्डनेही शुक्रवारी कोरोना कवच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जाहीर केली असून त्यात ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत संरक्षण दिले जाईल.