पेट्रोलची सलग 6 व्या दिवशी दरवाढ !

पुणे : पेट्रोल व डिझेलच्या किंमतीने आपली भाववाढीची घोडदौड सलग सहाव्या दिवशीही कायम ठेवली आहे. त्यामुळे पेट्रोल पुण्यात ९५ पार गेले आहे. त्याचवेळी अनेक शहरात प्रीमियम पेट्रोलने शंभरी पार केली आहे.

आज पेट्रोलच्या दरात लिटरमागे २५ पैशांची वाढ होऊन ते ९५.१० रुपये लिटर झाले आहे. तर डिझेलमध्ये आज २८ पैशांची वाढ झाली असून पुण्यात डिझेलची किंमत प्रति लिटर ८४.६८ रुपये इतकी झाली आहे. ही भाववाढ थांबण्याचे नाव घेत नाही.
राज्यात परभणीमध्ये साधे पेट्रोल ९७.३४ रुपये लिटर झाले असून प्रीमियम पेट्रोलचा दर १००.७६ इतका झाला आहे.

देशात पेट्रोल व डिझेलवर सर्वाधिक कर आकारला जातो. त्यामुळे भोपाळ मध्ये प्रीमियम पेट्रोलचा दर १००.०४, गंगानगर येथे १०२.०७ रुपये लिटर झाला आहे. तसेच बालाघाट, बर्‍हाणपूर, छिंदवाडा यासह अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे.