राज्यातील ‘फार्मासिस्ट’ यांना कोविड योद्धा म्हणून लसीकरण प्रक्रियेत प्राथमिकता द्यावी

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत मेडिकल, पॅरमेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना कोविड योद्धा म्हणून केंद्र व राज्य सरकारने मान्यता दिली. तसेच त्यांना लसीकरणामध्ये प्राथमिकता दिली. मात्र औषध विभागामध्ये सेवा देणाऱ्यांना यातून वगळण्यात आले. औषध विभागात काम करणाऱ्या फर्मासिस्टना कोविड योद्धा म्हणून लसीकरण प्रक्रियेत प्राथमिकता द्यावी, अशी मागणी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी असोसिएश, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी केली आहे.

मागणीची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणे यांना पाठवली आहे. निवेदनात म्हटले आहे की, औषध विभागामध्ये सेवा देणाऱ्या फर्मासिस्ट यांना केंद्र व राज्य सरकार यांनी कोविड योद्धा मधून वगळ्यात आले आहे. त्यामुळे नऊ लाख औषध व्यावसायिक व सेवा देणारे लसीकरण प्रक्रियेत प्राथमिकतेने वंचित राहिले आहेत. हे सर्व फार्मासिस्ट यांच्यावर अन्याकारक व घोर निराशाजनक आहे.

ADV

मागील एक वर्षापासून फार्मासिस्ट देखील कोरोना नियंत्रणाकरिता काम करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण करणे, औषध विक्री, औषध वितरण, औषध समुपदेशन इत्यादी मध्ये अहोरात्र सेवा देत आहे. तसेच गरजूंना मोफत औषधे, मोफत सॅनिटायझर व मास्क वाटप, दवाखान्यामध्ये रुग्णाला दाखल करण्यासाठी बेड उपलब्धतेची माहिती, रक्तपुरवठा, प्लाझ्मादान, ऑक्सिजन पुरवठा यासाठी झोकून देऊन काम करत आहेत. ‘आजाराला औषधाशिवाय इलाज नाही’ हे वास्तव असताना देखील औषध निर्माण करणाऱ्या औषध निर्मात्यालाच शासकीय व्यवस्थेने आजारी केले आहे. दुर्दैवाने दोनशे पेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दोन हजाराहून अधिक फार्मासिस्ट कुटुंबांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे राज्यातील फार्मासिस्ट यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.

त्यामुळे राज्यातील फार्मासिस्टना आपण कोविड योद्धा म्हणून मान्यता देऊन त्यांना लसीकरण प्रक्रियेत तात्काळ प्राथमिकता द्यावी. अशी मागणी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासी, पुणे माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.