1 January पासून बदलतील ‘या’ 10 महत्वाच्या गोष्टी, प्रत्येक बदल तुमच्या जीवनाशी निगडीत, जाणून घ्या

नवी दिल्ली : नवीन वर्ष 2021 आपल्यासोबत खुपकाही नवीन घेऊन येणार आहे. तुमच्या घरातील कॅलेंडरच नव्हे, तर तुमच्या आणि आमच्या जीवनाशी संबंधीत अनेक गोष्टी 1 जानेवारी 2021 पासून बदलणार आहेत. अशाच प्रकारचे 10 मोठे बदल जे जाणून घेणे खुप महत्वाचे आहे.

* 1 जानेवारीपासून महाग होणार कार

* 1 जानेवारीपासून गाड्यांना फास्टॅग बंधनकारक
1 जानेवारी 2021 पासून फास्टॅगशिवाय वाहनांना टोल ओलांडता येणार नाही. फास्टॅगशिवाय राष्ट्रीय महामार्गाचा टोल ओलांडणार्‍या वाहनचालकांना दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे. सध्या टोल प्लाझावर 80 लाईन फास्टॅगसाठी आणि 20 टक्के लाईन रोख रकमेसाठी वापरल्या जात आहेत. 1 जानेवारीपासून सर्व लाईन फास्टॅगसाठी केल्या जातील. फास्टॅग खात्यात किमान 150 रूपये रक्कम ठेवणे आवश्यक असेल, अन्यथा फास्टॅगला ब्लॅकलीस्टमध्ये टाकले जाईल.

* म्युच्युअल फंड गुंतवणूकीचे नियम बदलणार
गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेता, मार्केट रेग्युलेटर म्हणजेच सेबीने धोका कमी करण्यासाठी म्युच्युअल फंडाच्या नियमात काही बदल केले आहेत. सेबीने मल्टीकॅप म्युच्युअल फंडासाठी असेट अलोकेशनचे नियम बदलले आहेत. नवीन नियमांनुसार, आता 75 टक्के भाग इक्विटीमध्ये गुंतवावा लागेल, जो सध्या किमान 65 टक्के आहे. सेबीच्या नव्या नियमांनुसार मल्टी-कॅप फंडांची रचना बदलली जाईल. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 25-25 टक्के गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्याच वेळी 25 टक्के लार्ज कॅपमध्ये लावावी लागेल. पूर्वी फंड मॅनेजर त्यांच्या मनाप्रमाणे वाटप करत असत. सध्या मल्टीकॅपमध्ये लार्जकॅपचे वेटेच जास्त आहे. हा नवीन नियम 1 जानेवारी 2021 पासून अंमलात येईल.

* 1 जानेवारीपासून, यूपीआय पेमेंटसाठी द्यावे लागेल अतिरिक्त शुल्क
1 जानेवारीपासून अमेझॉन पे, गूगल पे आणि फोन पेमधून होणार्‍या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. वास्तविक, एनपीसीआयने 1 जानेवारीपासून थर्ड पार्टी अ‍ॅप प्रदात्यांद्वारे चालवल्या जाणार्‍या यूपीआय पेमेंट सर्व्हिस (यूपीआय पेमेंट) वर अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षात एनपीसीआयने थर्ड पार्टी अ‍ॅप्सवर 30 टक्के कॅप लावला आहे, तथापि पेटीएमला हे शुल्क भरावे लागणार नाही.

* लँडलाईनवरून मोबाइलवर कॉल करण्यापूर्वी शून्य लावणे आवश्यक
देशभरातील लँडलाईनवरून मोबाइल फोनवर कॉल करण्यासाठी आता 1 जानेवारीपासून नंबरच्या आधी शून्य लावणे आवश्यक असेल. ट्रायने 29 मे 2020 रोजी अशा कॉलसाठी नंबर डायल करण्यापूर्वी ’शून्य’ (0) लावण्याची शिफारस केली होती. टेलिकॉम कंपन्यांना अधिक नंबर बनवण्यास यामुळे मदत होईल. डायल करण्याच्या या पद्धतीत बदल केल्याने मोबाइल कंपन्यांना 254.4 कोटी अतिरिक्त मोबाइल क्रमांक तयार करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे भविष्यातील गरजा भागविण्यात मदत होईल.

* 1 जानेवारीपासून जीएसटी रिटर्नचे नियम बदलतील
छोट्या व्यापार्‍यांना दिलासा देण्यासाठी विक्री परताव्याच्या बाबतीत सरकार आणखी काही पावले उचलण्याची तयारीत आहे. त्याअंतर्गत जीएसटी प्रक्रिया आणखी सुलभ केली जाईल. वृत्तानुसार, या नव्या प्रक्रियेमध्ये, वार्षिक पाच कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करणार्‍या छोट्या व्यावसायिकांना पुढील वर्षी जानेवारीपासून वर्षभरात केवळ 4 सेल्स रिटर्न फाइल करावे लागतील. यावेळी व्यापार्‍यांना मासिक आधारावर 12 रिटर्न (जीएसटीआर 3 बी) दाखल करावे लागतात. याशिवाय 4 जीएसटीआर 1 भरावा लागतो. नवीन नियम लागू झाल्यानंतर करदात्यांना फक्त 8 रिटर्न भरावे लागतील. यापैकी 4 जीएसटीआर 3 बी आणि 4 जीएसटीआर 1 रिटर्न भरावा लागेल.

* कमी प्रीमियममध्ये 1 जानेवारीपासून खरेदी करू शकता टर्म प्लॅन
1 जानेवारीपासून आपण कमी प्रीमियममध्ये सरल जीवन विमा (स्टँडर्ड टर्म प्लॅन) पॉलिसी खरेदी करू शकता. आयआरडीएआयने विमा कंपन्यांना आरोग्य संजीवनी नावाचा स्टँडर्ड रेग्युलर इन्श्युरन्स प्लॅन सादर केल्यानंतर एक स्टँडर्ड टर्म लाइफ इन्श्युरन्स सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच निर्देशांचे पालन करत वीमा कंपन्या 1 जानेवारीपासून सरल जीवन विमा पॉलिसी लाँच करणार आहेत. नवीन विमा प्लॅनमध्ये कमी प्रीमियममध्ये टर्म प्लॅन खरेदी करण्याचा पर्याय मिळेल. सोबतच सर्व विमा कंपन्यांच्या पॉलिसीमध्ये अटी आणि कव्हरची रक्कम एक समान असेल.

* 1 जानेवारीपासून चेकद्वारे पैसे देण्याचे नियम बदलतील
1 जानेवारी, 2021 पासून, चेक पेमेंटशी संबंधित नियम बदलतील. त्याअंतर्गत 50,000 पेक्षा जास्त रकमेच्या धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम (पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टम) लागू होईल. पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टम हे एक ऑटोमॅटीक टूल आहे जे तपासणी करून फसवणूक थांबवेल. याअंतर्गत, जो व्यक्ती धनादेश जारी करेल, त्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने धनादेशाची तारीख, लाभार्थ्याचे नाव, प्राप्तकर्त्याचे नाव आणि देय रक्कम याबद्दल माहिती द्यावी लागेल. चेक जारी करणारी व्यक्ती एसएमएस, मोबाइल अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ही माहिती प्रदान करू शकते. यानंतर, चेक पेमेंट करण्यापूर्वी या माहितीची तपासणी केली जाईल. त्यात काही दोष असल्यास चेकचे पेमेंट दिले जाणार नाही.

* 1 जानेवारीपासून त्वरित मिळणार वीज कनेक्शन
सरकार वीज ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देऊ शकते. उर्जा मंत्रालय 1 जानेवारी 2021 पासून ग्राहक हक्क नियम लागू करण्याच्या तयारी आहेत. यानंतर वीज वितरण कंपन्यांना ग्राहकांना निर्धारित मुदतीत सेवा पुरवाव्या लागतील, जर असे केले नाही तर ग्राहक त्यांच्याकडून दंड वसूल करू शकतो. नियमांचा मसुदा कायदा मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ग्राहकांना नवीन कनेक्शन मिळण्यासाठी जास्त कागदपत्रांची गरज भासणार नाही. कंपन्यांना शहरी भागात सात दिवस, नगरपालिका क्षेत्रात 15 आणि ग्रामीण भागात एक महिन्यांत वीज कनेक्शन द्यावे लागेल.

* 1 जानेवारीपासून स्मार्टफोनमध्ये काम करणार नाही व्हॉट्सअप!
व्हॉट्सअप 1 जोवारी 2021 पासून काही स्मार्टफोनमध्ये काम करणे बंद करेल. यामध्ये अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हींचा समावेश आहे. व्हॉट्सअप जुन्या व्हर्जनच्या सॉफ्टवेयरला सपोर्ट करणार नाही. रिपोर्टनुसार, आयओएस 9 आणि अँड्रॉइड 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमने सुद्धा जुन्या व्हर्जनवर चालणार्‍या स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअप काम करणार नाही. आयफोन 4 किंवा यापेक्षा जुन्या आयफोनमधूनही व्हॉट्सअपचा सपोर्ट संपू शकतो. मात्र, याच्या पुढील व्हर्जनच्या आयफोन म्हणजे आयफोन 4एस, आयफोन 5एस, आयफोन 5सी, आयफोन 6, आयफोन 6एसमध्ये जर जुने सॉफ्टवेयर असेल तर त्यास अपडेट करता येईल. अँड्रॉइड 4.0.3 पेक्षाही जुन्या व्हर्जनवर चालणार्‍या स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअप सपोर्ट मिळणार नाही.