पिंपरी : माथाडी कामगारांच्या नावाने उकळली 1.75 लाखांची खंडणी; पिंपरी-चिंचवड माथाडी बोर्डाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांसह इतर 8 जणांविरूध्द FIR

पिंपरी : माथाडी कामगारांच्या नावाखाली कंपन्यांकडे खंडणी मागून त्यांना त्रस्त करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले असून चाकणमधील एका कंपनीच्या संचालकाकडून तब्बल पावणे दोन लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी चाकण पोलिसांनी अजय कोदरे, दत्ताभाऊ दौंडकर, काळुराम शंकर कोंदरे, कैलास कोंदरे, एकनाथ रोडे, अतुल बुरसे, भरत दत्तु देवाडे व त्यांचे साथीदार, पिंपरी चिंचवड माथाडी बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०१९पासून सुरु होता.

याप्रकरणी लक्ष्मण कारभारी यांनी चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची खेड तालुक्यातील भांबोली येथील इन्डोपेस इंडस्ट्रीयल पार्कमध्ये मुबीया अ‍ॅटोमेटीव्ही कम्पोनंटर नावाची कंपनी आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अजय कोदरे याने फिर्यादी व त्यांच्या कंपनीचे कामगार रवींद्र पांडे व समशेर सिंग यांना सांगितले की, माझ्या माथाडी कामगार टोळीचे २ कामगार नेमा. ते तुमचे कंपनीत प्रत्यक्षात कधीही काम करणार नाहीत. तुम्ही त्या २ कामगारांचा २० हजार रुपये पगार प्रत्येक महिन्याला चेकद्वारे पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळात भरायचा. जर तुम्ही या प्रमाणे माझे ऐकले तर तुम्हाला माझ्या माथाडी कामगार टोळीकडून अथवा इतर माथाडी टोळीकडून कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जर तुम्ही माझे ऐकले नाही तर मी तुमची वाट लावीन आणि तुमच्यापैकी एखाद्याला जीव गमवावा लागेल़ या भागात तुम्ही कंपनी कशी चालविता, ते मी बघतो, अशी धमकी दिली.

अजय कोदरे याचे २ कामगार कंपनीत प्रत्यक्ष काम करत नसतानाही कोदरे याने खंडणी स्वरुपात १ लाख ७३ हजार ७०० रुपये घेतले. ग्रामीण पोलीस दलात हा सर्व भाग यापूर्वी होता. तेव्हापासून येथील अनेक कंपन्यांना माथाडी कामगारांच्या नावाखाली त्रास देऊन खंडणी उकळली जात आहे. याबाबत अगदी जर्मनीच्या भारतातील राजदूतांनी यापूर्वी तक्रार केली होती. आता हा सर्व भाग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आल्यानंतरही पोलिसांना हा प्रकार थांबविण्यास यश आले नसल्याचे दिसून येत आहे.