Pimpri News : इंग्लंडहून शहरात आलेल्या 115 जणांपैकी 1 युवक ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा इंग्लंडमध्ये नवा स्ट्रेन आढळून आला आहे. त्यामुळे इंग्लंडहून भारतात आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मुंबई विमानतळावर (Mumbai Airport)
आलेल्या प्रवाशांची यादी राज्यातील प्रत्येक महानगरपालिकांना पाठवण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation)
हद्दीमध्ये इंग्लडहून 115 प्रवासी आल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एका 35 वर्षीय युवकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह ( Corona positive ) आल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

इंग्लंडहून आलेल्या एकूण 115 प्रवाशांपैकी एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 19 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर 70 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आलेला युवक दहा दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये आला होता. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला भोसरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली आहे.

डॉ. पवन साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड येथून एकूण 115 प्रवासी आले आहेत. या सर्व प्रवाशांचा महापालिका प्रशासनाकडून शोध घेण्यात आला असून 15 प्रवासी पिंपरी चिंचवड शहराबाहेर निघून गेले आहेत. शहराबाहेर निघून गेलेल्या 15 प्रवाशांचे पत्ते अपूर्ण असल्याने त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. 85 प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 70 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 15 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. चाचणी करण्यात आलेल्या प्रवाशांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.