काय सांगता ! होय, श्वान अन् घोड्यांनाही मिळणार पेन्शन, ‘या’ देशाच्या संसदेत आणला जाणार कायदा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – युरोपातील पोलंड या देशानं एक नवा पायंडा घातला आहे. पोलंड पोलीस, बॉर्डर गार्ड आणि लष्करी सेवेतील सेवानिवृत्त होणाऱ्या श्वान, घोड्यांना पेन्शन सेवा सुरु करण्याचे विधेयक पोलंड सरकारने तयार केले आहे. या विधेयकामुळे देशासाठी सेवा दिल्यानंतरही प्राण्यांची योग्य काळजी घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. लवकरच हे विधेयक पोलंडच्या संसदेत मांडले जाणार आहे. या नव्या कायद्यामुळे देशासाठी सध्या सेवा देत असलेल्या जवळपास 1200 श्वान आणि 60 हून अधिक घोड्यांना याचा लाभ होणार आहे.

पोलंडमध्ये सध्या सरकारी सेवेतील श्वान आणि घोडे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावर कोणताही खर्च केला जात नाही. त्यांना इतर संस्थांकडे सोपविण्यात येते किंवा दत्तक घेण्यासाठी इच्छुक असणऱ्यांकडे प्राण्यांना सोपविण्यात येत होते. मात्र आता सुरक्षा दल आणि पोलीस दलातील सदस्यांच्या मागणीनंतर गृह मंत्रालयाने नव्या कायद्याचा प्रस्ताव ठेवला आहे देशासाठी सेवा देणाऱ्या श्वान आणि घोड्यांना या योजनेतून अधिकृत दर्जा आणि पेंशन सुविधा मिळणार आहे. सेवानिवृत्त प्राण्यांच्या देखभालीसाठीचा खर्च संबंधित प्राण्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणार आहे. पण पेन्शन म्हणून दिली जाणारी रक्कम प्राण्यांच्या देखभालीवरच खर्च करण्याची अट राहणार आहे. देशासाठी सेवा देणाऱ्या प्राण्यांची काळजी घेणारा कायदा करण ही नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे या कायद्याला सदनातील सर्व सदस्यांची मंजुरी मिळावी, असे गृहमंत्री मॉरिस कमिन्सकी म्हणाले. सरकारच्या माहितीनुसार, दरवर्षी जवळपास 10 टक्के प्राणी सेवानिवृत्त होतात. यात श्वानांमध्ये जर्मन शेफर्ड प्रजातीच्या श्वानांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यांचा वैद्यकीय आणि देखभाल खर्च खूप मोठा असतो. त्यामुळे पेन्शन योजनेमुळे श्वानांना खूप मदत मिळणार आहे.