पोलीस आयुक्तालय सुरु करणे पोलीस चौकी सुरु करण्यासारखे नाही : गिरीश बापट

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

एक मे पासून पिंपरीत नवीन पोलीस आयुक्तालय सुरु करणार अशी घोषणा करणारे पालकमंत्री गिरीश बापट आयुक्तालयाच्या एका प्रश्नावरून चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. आयुक्तालय कधी सुरु होणार? या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, पोलीस आयुक्तालय सुरु करणे पोलीस चौकी सुरु करण्याएवढे सोपे नाही. तात्पुरती भाडोत्री इमारत घेऊन पोलीस आयुक्तालय स्थापन करू तसेच नवीन कायमस्वरूपी इमारतीसाठी मध्यवर्ती ठिकाणी जागा शोधण्याचे कामही पूर्ण करू, असे आश्वासन बापटांनी दिले.

काळेवाडी- चिंचवड दरम्यान वाहतुकीसाठी बनवलेल्या ‘एम्पायर इस्टेट’ पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते येथे आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते पुलाचे उदघाटन करण्यात आले. यांनतर त्यांना आयुक्तालयाविषयी प्रश्न विचारला असता बापट संतापलेले पाहायला मिळाले.

पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयास मंजुरी देऊन एक मे पासून कामकाजास सुरवात करू असे आश्वासन बापट यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. परंतु १ मे उलटून दोन आठवडे झाले तरी काहीच कार्यवाही केली गेली नाही. याच आश्वासनाची आठवण करून देत , आयुक्तालय कधी सुरु होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर नाराज झालेले बापट म्हणाले , पोलीस आयुक्तालय सुरु करणे म्हणजे पोलीस चौकी सुरु करण्याएवढे सोपे नाही. तसेच आयुक्तालयाची प्रक्रिया लवकर होणारी नसते. सध्या तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालय सुरु करण्यासाठी एक इमारत भाड्याने घेऊन त्यात कामकाज सुरु करू असे पुन्हा एकदा आश्वासन त्यांनी दिले. तसेच नवीन कायमस्वरुपी इमारतीसाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त आणि पुरेशी जागा शोधण्याचे जागा शोधण्याचे काम सुरु करू असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दोन-तीन तात्पूरत्या भाडोत्री इमारती पहिल्या असल्याचे पत्रकारांना सांगतानाच नव्या इमारतीसाठी चांगली जागा शोधून काढण्यास सांगितले. यावेळी महापौर नितिन काळजे,आमदार व भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, मोरेश्वर शेंडगे, अमोल थोरात, विजय लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.