Pune News : पुण्याचा ‘प्रकल्प टेके’ भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर रुजू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तराखंडमधील डेहराडून येथे इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या 147 व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारंभ नुकताच पार पडला. मित्र राष्ट्रासह देशातील विविध भागातील 350 पेक्षा अधीक तरुणांनी या ठिकाणी आपले प्रशिक्षण पूर्ण केले असून ते आता देश सेवेत रुजू झाले आहे. पुण्यातील औंध येथील लेफ्टनंट प्रकल्प टेके याचाही यामध्ये समावेश आहे.

घरात कोणतीही लष्करी पार्श्वभूमी नसताना लहानपणीच लष्करात अधिकारी होऊन देश सेवा करण्याचे स्वप्न प्रकल्प यांनी पाहिले होते. पाहिलेले स्वप्न करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. दैनंदिन अभ्यास वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, बास्केटबॉल, एनसीसी या सर्वांमधून स्वत: सर्वसमावेशक व्यक्तीमत्व तयार केले.

प्रकल्प टेके यांनी आपले बारावी पर्यंतचे शिक्षण औंध येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमधून पूर्ण केली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) खडकवासला येथे प्रवेश मिळवून तेथील तीन वर्षे व इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून (IMA) येथे पुढील एक वर्षे अशी एकूण चार वर्षे खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन ते लेफ्टनंट या पदावर रुजू झाले आहेत. आर्मी सर्व्हिस कोर्प (ASC)ही त्यांनी प्रथम क्रमांकाने मिळाल्याने त्यांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सध्या त्यांची नियुक्ती अरुणाचल प्रदेशात भारत-चीन सीमेवर झाली आहे.

भारतीय लष्करात देशसेवेसाठी दाखल झालेल्या सर्व नवअधिकाऱ्यांच्या अभिमानी पालकांना ‘मेरी संतान देश को समर्पित’ असे गौरव पदक भारत सरकार तर्फे देऊन सन्मानित करण्यात आले आहे. एकुलता एक मुलगा भारतीय लष्करात अधिकारी झाल्याचा अभिमान असल्याचे प्रकल्पच्या आईने सांगितले. प्रकल्पची आई पुणे महापालिकेच्या शाळेत शिक्षिका असून वडिल राज्य सरकारच्या सेवेत अधिकारी आहेत.

‘बॉर्डर’ चित्रपटातील ‘त्या’ पात्रामुळे मिळाली प्रेरणा

प्रकल्प याच्यावर लहानपणीच सनी देवोलची भूमिका असलेल्या बॉर्डर चित्रपटातील मेजर कुलदीपसिंग या पात्राची छाप पडली. त्यामुळे त्याने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या बरोबर पुण्यासह राज्यातील इतरही तरुण लष्करात सैन्य अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. मात्र, ही संख्या अत्यंत कमी आहे. तरुणांनी व पालकांनी इतर क्षेत्राबरोबरच लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न पहावे व देश सेवेत यावे. या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध असून तरुणांना करियरसाठी नक्कीच चांगले असल्याचे प्रकल्प टेके यांनी सांगितले.