अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला; रोडरोमिओला सक्तमजुरी शिक्षा

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन – चार वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करून नंतर तिच्या डोक्यात दगड मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या रोडरोमिओला सोमवारी (दि.15) अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्या.सुप्रिया सापटनेकर यांनी दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच 30 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. परळी शहरात ही घटना घडली होती.

सतीश वसंत मंत्रे असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, इयत्ता आठवीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी वाटेत सतीशने तिची छेड काढून जीवे मारण्याची धमकी दिली होती. घाबरलेल्या पिडीतेने झालेली घटना पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी सतीशच्या घरी जाऊन त्याला समजावून सांगितले होते. त्यामुळे संतापलेल्या सतीशने पीडिता सकाळच्या वेळी शाळेत जाताना तिला वाटेत अडवले. तू घरी का सांगितलीस असे म्हणत तिला शिवीगाळ करत चाकूने तिच्या पोटावर वार करून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या पिडीतेच्या डोक्यात मारण्यासाठी त्याने मोठा दगड उचलला. परंतु, सतीश दगड मारणार तेवढ्यात तिथे जमा झालेल्या लोकांनी त्याला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. नागरिकांनी पिडीतेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सतीश मंत्रे याच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात पोक्सोसह विनयभंग आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरिक्षक डी.बी. काळे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यालयात सादर केले.

या खटल्याची सुनावणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्या.सुप्रिया सापटनेकर यांच्या न्यायालयासमोर झाली. यावेळी आरोपीने वेडाच्या भरात हल्ला केलाचा बचाव सुनावणी दरम्यान झाला. परंतु, सतीशला बारावीला चांगले गुण मिळाले आहेत, तो नोकरी करतो, तसेच सोबत दोन मुली असताना त्याने फक्त पिडीतेवरच हल्ला केला. यावरून त्याने हे कृत्य जाणीवपूर्वक केल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याआधारे न्यायालयाने सतीशचा बचाव फेटाळला आणि त्याला दोषी ठरवले. न्यायालयाने सतीशला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अशोक कुलकर्णी यांनी काम पहिले. त्यांना ॲड. डी.डी. लांब आणि ॲड. एन.एस. पुजदेकर व पैरवी चौधर यांनी सहकार्य केले.