Pune : मुंढवा पब गोळीबार प्रकरणातील आरोपी अमोल चव्हाणला उच्च न्यायालयाकडून दिलासा, दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंढवा भागातील हॉटेल/पब मध्ये गोळीबार केल्याप्रकरणात पोलिसांनी आरोपी अमोल चव्हाण सह इतर १० साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा(मोक्का) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाने आरोपी अमोल चव्हाण याला दिलासा दिला असून १६ जून पर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंढवा येथील हॉटेल वाय किकी टिकी लौन्ज पब मध्ये जून २०१८ रोजी तक्रारदार यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. तेथे निलेश चव्हाण व त्याचे साथीदार आले होते. तेथे टोळीप्रमुख सचिन पोटे हा अजय शिंदे व इतर साथीदारांसोबत तेथे आला होता, त्यावेळेस निलेश चव्हाण याच्या नावाने वारंवार अनाउंसमेंट झाल्याने सचिन पोटे व निलेश चव्हाण यांच्यात वाद झाला, तेंव्हा पोटे याने पिस्टलीतून निलेश चव्हाण वर दोन गोळ्या झाडल्या व त्याच्या साथीदारांनी तोडफोड करून सीसीटीव्ही चा डी व्ही आर जबरदस्ती घेऊन गेले, अश्या आशयाची तक्रार फिर्यादी याने मुंढवा पोलीस स्टेशन येथे दिली.त्यानंतर सचिन पोटेसह इतर १० आरोपींविरुद्ध मोक्कानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरील कारवाईविरुद्ध आरोपी अमोल सतीश चव्हाण(वय-३१, रा- चव्हाणवाडा, कोथरूड, पुणे) याने उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सदरील घटना ही २०१८ मधील असून त्यावेळेस फक्त तोडफोडीची तक्रार दाखल होती व आता फिर्यादी याने २०२१ मध्ये गोळीबाराची तक्रार दिल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

न्यायालयाने याबाबत पोलिसांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले असून तोपर्यंत आरोपीला अटक न करण्याचे व कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले. आरोपीतर्फे ऍड. प्रताप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड. अभिषेक अवचट, ऍड.सिद्धांत मालेगावकर, ऍड.मजहर मुजावर व ऍड.प्रमोद धुळे यांनी कामकाज पाहिले.