पुण्यात बडया व्यावसायिकाची 1.63 कोटींची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील एका बड्या व्यावसायिकास दोघांनी झांबिया देशात वस्तूकरून विक्री करण्याच्या बहाण्याने तबल 1 कोटी 63 लाख 49 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2016 ते 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी व्यावसायिक विकास सावंत (वय 59) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एजाज रियाज शेरकर (वय 49, रा. कोंढवा) आणि प्रवीण वसंत माटे (रा, कर्वेनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा इंडवे इंटरनॅशनल या नावाने आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. दरम्यान त्यांची कॉमन मित्राने या दोघांची 2016 साली एका कॉफी डेमध्ये एजाज याच्याशी ओळख करून दिली होती. त्यावेळी त्याने आपण झांबिया या देशात राहण्यास असून, तेथे भारतातील वस्तू आयात करून विक्री करतो असे सांगितले. तसेच त्यांना भारतातील वस्तू आयात करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर त्यांच्यात व्यावसायिक गोष्टीवर चर्चा झाली. त्यानंतर त्याने सतत संपर्ककरून फिर्यादी यांना वह्या निर्यात करण्याचा आग्रह धरला. तसेच सांगली येथील आरोपीच्या ओळखीच्या एका वह्या तयार करणाऱ्या बुक्समधून त्या घेण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी व त्यांची पत्नी सांगली येथे जाऊन या वह्या बनवणाऱ्या कंपनीला भेट देऊन तसेच मालकासोबत चर्चा केली. त्यांनी देखील एजाज सोबत काम करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. तर मुंबईत एकास भेटण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी मुंबईतील व्यक्तीस देखील भेटले.

त्यानंतर मात्र आरोपीं दोघांनी त्यांच्याकडून वह्या, सॅनीटायझर, नॅपकीन व इलेक्ट्रॉनिक वस्तू अश्या 7 कंटेनर माल समृद्धी इन्व्हेस्टमेंट आणि लॉगवॉक झांबिया या कंपनीच्या नावे मागवली. मात्र 43 हजार यु.एस. डॉलर फिर्यादी यांना परत केली. परंतु उर्वरित 2 लाख 33 हजार 559 यु. एस. डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 1 कोटी 63 लक्ष 49 हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली आहे. अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.