Pune Court News | कोट्यावधींची फसवणूक करणार्‍या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : Pune Court News | जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

माजीद उस्मान आत्तार (रा. बोपोडी), खालीद मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी) अशी अटकपूर्व जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणातील मुख्य आरोपीच्या आर्थिक फसवणुकीची आणि बेकायदेशीर कारवायांची माहिती आरोपींना होती. आरोपी हे प्रभावशाली लोक असून त्यांचा राजकीय व्यवस्थेशी सखोल संबंध आहे. जर त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला गेला तर ते भारतातून पळून जाण्याची शक्यता आहे. हा सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेता, या प्रकरणात आरोपींची पोलिस कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे आरोपी-अर्जदारांना अटकपूर्व जामीन मंजूर करता येत नाही, असे सांगून दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले.

या प्रकरणात समर्थ पोलिसांनी आतापर्यंत अब्दुल हुसेन हसनअली नईमआबादी व रोया ऊर्फ सीमा अब्दुल हुसेन नईम आबादी (वय ३५, रा. कॅम्प) आणि मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार (वय ३७, रा. मस्जिद मोहल्ला बोपोडी) अशा तिघांना अटक केली आहे. माजीद आत्तार आणि खालीद आत्तार यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाकडून ॲड. मारुती वाडेकर व फिर्यादी तर्फे ॲड. महेश झवर , ॲड. अमेय सिरसिकर, श्रीकृष्ण घुगे, गणेश गोरवडे , सिद्धांत बडे यांनी सांगितले की आरोपींनी या गुन्ह्यात सक्रिय भूमिका बजावली आहे. आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला तर ते मुख्य आरोपींना फिर्यादीच्या पुराव्याशी छेडछाड करण्यास मदत करु शकतात. शिवाय, त्यांना या प्रकरणातील मुख्य आरोपींच्या आर्थिक फसवणुकीची आणि बेकायदेशीर कारवायांची माहिती आहे. आरोपी आणि सहआरोपींनी माहिती देणार्‍याची आणि इतर गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या मोठ्या रकमेचा विचार करता, मला असे वाटते की गुन्ह्याच्या प्रभावी तपासासाठी आरोपी-अर्जदारांची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे.

याप्रकरणात समर्थ पोलिसांनी नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमा आबादी (रा. सिनागग ईस्ट्रीट, कॅम्प), रोया उर्फ सीमा नादीर नईमा आबादी (वय ३५, रा. कॅम्प), मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), माजीद उस्मान आत्तार (रा. बोपोडी), खालीद मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), इरम शोऐब आत्तार (रा. बोपोडी) यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमन १९९९ चे कलम ३ चा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत रास्तापेठ येथे घडला. याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतिफ (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी मौलाना शोएब व नादीर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपींनी संगनमत करुन त्यांचा कोणताही इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय नसताना या व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले. त्यावर विश्वास ठेवून शेख यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे २ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा न देता फसवणूक केली होती. याप्रमाणेच या आरोपींनी आणखी तिघांची फसवणूक केल्याचे गुन्हे गेल्या ४ महिन्यांमध्ये तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या चार गुन्ह्यांमध्ये एकूण ६ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तृतीयपंथी महिले कडून पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, कोरेगाव पार्क परिसरातील घटना