Pune : कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा – डॉ. मंगेश वाघ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना महामारीने माहिल वर्षभरापासून जगभर थैमान घातले आहे. पहिल्या लाटेतून सावरत असतानाच दुसरी लाट धडकली. मात्र, त्यामध्ये जमेची बाजू म्हणजे लस उपलब्ध झाली आहे. पूर्वीच्या काळी साथीचे आजार आले, त्यावेळी तंत्र अवगत नव्हते. मात्र, आता तंत्रत्रान असूनही कोरोना महामारीने जगला कवेत घेतले आहे. त्यामुळे आजार कोणताही असला तरी वेळीच उपचार करून घेणे सर्वांच्या हिताचे ठरणार आहे. कोरोना महामारीवर विजय मिळविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करणे, सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे, असे मत हडपसर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. मंगेश वाघ
यांनी व्यक्त केले.

डॉ. वाघ म्हणाले की, वैद्यकीय व्यावसायिकांना साथरोग नवीन नाही. मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे. संपूर्ण जग या कोरोना विषाणूच्या साथीने वेठीस धरले आहे. कोरोनाने मृत्यू आणि त्यातून बरे होणाऱ्या रुग्णांमधील गुंतागुंतीमुळे सामान्य माणूस काय आमचं वैद्यकीय क्षेत्रही हादरलं आहे. आतापर्यंतच्या अनेक साथीचे आजार आले मात्र कोरोना महामारी काहीशी वेगळीच आहे. जुन्या पिढीतील मंडळींना प्लेग, पटकी, मलेरियासारख्या साथी त्यांना आठवतात. आपण त्यांचा इतिहास म्हणूनच वाचला आणि अभ्यास केला. वाटायचं की वैद्यक शास्त्र एवढं प्रगत नव्हतं, दळणवळणाची साधनं अपुरी होती, त्यामुळे त्याकाळी साथीचे आजार बळावले असतील. पण आज सर्वच क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे, तरही या सूक्ष्मजीवानं मानवजातीला जेरीस आणले आहे.

कोरोना महामारीविषयी सुरूवातीला वैद्यक क्षेत्रही काहीस अनभिज्ञ होतं, गोंधळलेलं होतं पण वेळीच सावरून जगातील विविध भागातील डॉक्टरांनी आपल्या अनुभवाबद्दल एकमेकांशी चर्चा केली. त्यातून या आजाराबद्दलचे उपचार, प्रतिबंधात्मक उपाय याची मार्गदर्शक तत्त्वे तयार झाली. मात्र, अजूनही नवीन बाबी लक्षात येत आहेत, जसे की सौम्य, मध्यम, गंभीर आजाराची लक्षणे आणि उपचार, नंतर होणारी गुंतागुंत याविषयी छोटेछोटे बदलांवरही वैद्यकीय क्षेत्र लक्ष ठेवून आहे. साथीच्या सुरूवातीपासूनचं प्रतिबंधात्मक उपायासाठी यावरील प्रभावी लस तयार व्हावी, याच्याकडे जगाचे लक्ष लागले होते. आता शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. वेगवेगळ्या प्रभावी लसी तयार झाल्या आहेत, पण या साथीची एक लाट आटोक्यात येऊन जनजीवन सुरळीत होतानाच दुसरी लाट आली आणि तिनं धुमाकूळ घातला आहे.

एक फॅमिली फिजिशियन (फॅमिली डॉक्टर) म्हणून आमची जबाबदारी खूप पटीने वाढली, कारण आम्हाला फक्त उपचार करायचा नव्हता, तर एक कौटुंबिक सदस्याच्या भूमिकेतून प्रत्येक रुग्ण आणि नातेवाईकांना धीर द्यायचा होता, न ऐकणाऱ्या रुग्णांना कधी गोंजारून कधी दराडावून उपचारासाठी, तपासणीसाठी ते अॅडमीट करण्यासाठी तयार करावं लागत होतं. आम्ही फॅमिली फिजिशियन या लढाईतील सर्वात पुढची असणारी फळी आहोत. कोविडचे संशयित रूग्ण ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे त्याचबरोबर इतर आजाराच्या पेशंटची काळजी घेणे, प्रशासनांने, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देणे, नवीन मार्गदर्शक तत्वे समजून घेण्यासाठी आमचं वैद्यकीय ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी ऑनलाईन वेबीनारला हजेरी लावणे, हे सर्व करताना स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेणे अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या लढाईत जवळचे नातेवाईक, स्वतःच्या नातलगांपेक्षा आमच्या शब्दावर विश्वास ठेवणारे रुग्ण आणि खांद्याला खांदा लावून लढणारे सहकारी डाव अर्धवट सोडून गेले. मात्र, हताश न होता आपण आणि आम्ही ही लढाई लढत आहोत. माझ्यासारख्या अनेक फॅमिली फिजिशियनची हीच अवस्था आहे. साथरोग तज्ञांचे मत आहे की, या कोरोना साथीची ही दुसरी लाट आहे, अशी अजून पुढे लाट येणार आहेत. वर्षांपूर्वी आपल्या हातात काहीच नव्हत. मात्र, आता लस उपलब्ध झाली आहे, तरी लहान मुलांचा प्रश्न आहे. ज्याप्रमाणे या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे. आता कोरोनानंतर काळी बुरशी हा जीवघेणा आजार पसरत आहे. त्यामुळे फॅमिली डॉक्टर या नात्याने माझी सर्वांना विनंती आहे की कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी जी मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत, तिचा अवलंब करा. मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायजरचा वापरणे, फिजीकल डिस्टंसिंगचे म्हणजे गर्दी टाळणे यांचा काटेकोरपणे पालन करणे स्वतःबरोबर इतरांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आजाराची कोणतीही लक्षणं जाणवली तर वेळीच डॉक्टरांकडून उपचार करून औषधे वेळेत घ्या, यातच तुमचे-आमचे हित आहे. दवाखान्यात न जाण्याचं टाळा, घरी थांबून तपासणी व उपचाराअभावी प्रकृती जास्त बिघडण्याची शक्यता असते.

लहान मुलं, वयोवृद्ध, तसेच इतर आजार असणाऱ्यांची जास्त काळजी घ्या. वेळेवर तपासणी करून निदान केले, तर लवकर उपचार हा कमी खर्चात आणि जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वी होतो. जिवीताला धोका निर्माण होणाऱ्या गंभीर रूग्णांमधे काही औषधं त्यावेळी जीव वाचविण्यासाठी द्यावी लागतात काही लोकांना त्यामुळे भविष्यात त्रास होवू शकतो. मृत्यू दर हा २% जरी असला, तरी ज्याच्या घरातील व्यक्ती जाते त्यांच्यासाठी हा शंभर टक्केच आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे कुटुंबाचं नुकसान होतं प्रियजनांची वाताहात होते पर्यायाने समाजाची देशाची हानी होते.

कोरोना महामारीतून बरे झालेल्या रूग्णांनीही स्वतः कडे विशेष लक्ष दिले पाहिजे, सल्ल्याप्रमाणे औषधं वेळेवर घेणे, काही वेगळी लक्षण जाणवली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे, विशेष करून मधुमेह आणि हृदयरोग असणारे रूग्णांनी नियमित तपासणी, रक्ताची तपासणी केली पाहिजे.

कोणीही आजाराला घाबरून न जाता सर्वांनी धीराने आणि समजूतदारपणे प्रकृतीची काळजी न करता काळजी घेतली पाहिजे. योग्य व सकस आहार , वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छतेचे पालन केले पाहिजे. लॉकडाऊन आहे बाहेर जाता येत नाही, तरीसुद्धा घरातल्या घरात आपल्या प्रकृतीला सोसेल असा व्यायाम नियमित केला पाहिजे. मुख्यत्वे श्वसनाचे व्यायाम केले पाहिजेत. घाबरून जाऊ नका खबरदारी घ्या, योग्य वेळी निदान आणि औषधोपचार करा त्याचबरोबर लवकरात लवकर नजीकच्या लसीकरण केंद्रावर आपल्या वयोगटाप्रमाणे लसीकरण आवश्य करा. या लढाईत आम्हा वैद्यकीय सेवेत असणाऱ्या सर्वांना तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे.