Pune Hadapsar Fire News | हडपसर परिसरातील भन्नाट बिर्याणी हाऊसमध्ये सिलेंडरचा स्फोट (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Fire News | हडपसर परिसरातील सातववाडी येथील साईनगर सोसायटीत असलेल्या भन्नाट बिर्याणी हाऊस (Bhannat Biryani House) मध्ये आग लागली. यामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. यात शेजारच्या दोन दुकानांना देखील आग लागली. ही घटना शनिवारी (दि.10) मध्यरात्री सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली. पुणे अग्निशमन दलाने घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन आग विझवली. या घटनेत जखमी अथवा जिवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री 03.12 वाजता हडपसर, सातववाडी, साईनगर सोसायटी येथे असलेल्या भन्नाट बिर्याणी हाऊस या हॉटेलमध्ये आग लागल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून काळे बोराटे नगर व हडपसर अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहचताच जवानांनी पाहिले असता, तळमजला अधिक दोन मजली इमारतीत तळमजल्यावर असणाऱ्या भन्नाट बिर्याणी हाऊसमध्ये आग लागली होती. तसेच वर दोन मजल्यावर सदनिकेत काही रहिवाशी असल्याचे ही समजले. त्याचवेळी तातडीने जवानांनी ०३ पुरुष व ०३ महिला यांना सुरक्षित ठिकाणी नेत बिर्याणी हाऊसचे शटर उघडून आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. दलाची मदत पोहोचण्यापुर्वी नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. जवानांनी घटनास्थळावरुन तीन सिलेंडर बाहेर काढले तर एका सिलेंडरचा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले. पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणत जवानांनी कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवत तीस मिनिटात आग पुर्ण विझवत पुढील धोका दूर केला. या आगीमध्ये बिर्याणी हाऊसमधील सर्व वस्तुंचे पुर्ण नुकसान झाले असून शेजारी असलेल्या इतर दोन दुकानांना आगीची झळ बसली आहे. या घटनेत जखमी वा जिवितहानी नाही.

ही कामगिरी अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड तसेच वाहनचालक राजू शेख, नारायण जगताप व फायरमन अनिमिष कोंडगेकर, बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले, केतन घाडगे, संकेत शिंदे, डगळे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉड व वायफरने मारहाण, खराडी परिसरातील घटना