Pune News : पुण्यातील प्रकरणात खलिस्तान समर्थकाला अटक

पुणे : चाकण परिसरात बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी खलिस्तान समर्थकाला एटीएसने अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली.

गुरुजीतसिंग निज्जर (रा. पंडोरी, सुखसिंग, अंजाला, अमृतसर, पंजाब) असे अटक केलेल्या खलिस्तान समर्थकाचे नाव आहे. सायप्रस येथून त्यांची हकालपट्टी झाल्याने त्याला भारतात पाठविण्यात आले होते.

महाराष्ट्र एटीएसने २ डिसेंबर २०१८ रोजी चाकण येथे हरपालसिंग नाईक याला बेकायदा बंदुक व ५ जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.  या गुन्ह्याचा तपास करताना एटीएसने मोहिउद्दीन सिद्दिकी ऊर्फ मोईन खानलाही अटक केली होती. या प्रकरणात ते संशयित आरोपी होते. १० जानेवारी २०१९ रोजी एनआयएने हे प्रकरण आपल्या ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान सिंह, सिद्दिकी आणि फरार आरोपी गुरुजीतसिंग निज्जर यांनी खलिस्तान राज्य स्थापनेसाठी दहशतवादी कृत्य करण्याचा गुन्हेगारी कट रचला होता. गुरुजीतसिंग हा मुख्य सुत्रधार असून फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप आणि आयएमओमार्फत सायप्रसमधील त्याच्या साथीदारांसोबत काम करतो.

खलिस्तानच्या वेगळ्या राज्यासाठी गुरजितसिंग निज्जर, हरपालसिंह आणि मोईन खान हे जुने व्हिडिओ, फोटो टाकून खलिस्तानी चळवळीला पुनरुजिवित करण्याचा प्रयत्न करीत होते.

गुरजितसिंग निज्जर हा १९  ऑक्टोबर २०१७ रोजी सायप्रसला पळून गेला होता. त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. त्याला मंगळवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. त्याला एनआयएच्या मुंबईच्या अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.