Pune : दस्त डाऊनलोड होत नसल्याने वकील पक्षकार त्रस्त; तांत्रिक बिघाड दूर करण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शुल्कभरल्यानंतर ऑनलाइन दस्त डाऊनलोड करण्यात तांत्रिक अडचण येत आहेत. दस्त वेळेवर मिळत नसल्याने वकील, पक्षकारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दस्त डाऊनलोड होण्यास येणाऱ्या समस्या तत्काळ दूर कराव्या, अशी मागणी पुणे बार असोसिएशनच्या सदस्यांमार्फत करण्यात आली आहे.

स्थावर मालमत्तेची खरेदी करण्यापूर्वी शोध व शीर्षक अहवाल घेतला जातो. हा अहवाल घेण्यासाठी मिळकतीचे पूर्वी नोंदणी झालेले दस्त बघितले जातात. दस्तांची साक्षांकित प्रत नक्कल शुल्क भरून शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळते. मात्र सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी टाळण्याच्या उद्देशाने पूर्वी नोंदणी झालेल्या दस्तांची प्रत देणे तात्पुरते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वकील, पक्षकारांना दस्तांची साक्षांकित प्रत मिळण्यासाठी ऑनलाइन सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. पण गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने प्रत डाऊनलोड होण्यात अनेक अडचणी येत आहेत, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे सदस्य ॲड. आनंद धोत्रे यांनी दिली.

याबाबत वारंवार तक्रार करून देखील अद्याप समस्या दूर झालेली नाही. दस्त मिळत नसल्याने वकील, पक्षकारांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे ही तांत्रिक अडचण तत्काळ दूर करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत असोसिएशनचे सदस्य ॲड. आनंद धोत्रे, ॲड. आकाश मुसळे, ॲड. सचिन पोटे, ॲड. अमोल तनपुरे यांनी याबाबत नोंदणी व मुद्रांक विभागातील नोंदणी महानिरीक्षकांना निवेदन दिले आहे.