Pune Lonikand Crime News | ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे पत्नीचा काढला काटा, मात्र, चौकशीत फसला; पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या पतीला लोणीकंद पोलिसांकडून अटक (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दृश्यम चित्रपटाप्रमाणे प्लान केला. कंपनीत कामावर असल्याचे रेकॉर्ड मॅनेज केले. पत्नीचा शोध घेण्यासाठी पोलिसांसोबत फिरला. अडीच महिने पोलिसांना तो फिरवत राहिला. मात्र, पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर तो फसला. अखेर पत्नीचा मांढरदेवी घाटात खून करून मृतदेह खोल दरीत फेकून दिल्याची कबुली आरोपीने दिली. पत्नीचा खून केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

ललिता अमोलसिंग जाधव (वय-38 रा. फुलगाव ता. हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अमोलसिंग मुरली जाधव (वय-26 रा. भैरवनाथ मंदिराजवळ, फुलगांव, ता. हवेली मुळ रा. मु.पो. अंजिनाईक ता. अरणी जि. यवतमाळ) याच्यावर आयपीसी 302, 201, 182 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रकाश नारायण आव्हाळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात रविवारी (दि.14) फिर्याद दिली आहे. ही घटना 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी आठ ते दोन दरम्यान वाई तालुक्यातील मांढरदेवी ते वाई रोडवरील घाटात घडली होती.

मिसींग दाखल झाल्यानंतर तपास पथकाने आरोपीच्या पत्नीचा शोध सुरु केला. आरोपी अमोलसिंग याने त्याच्या नातेवाईकांची नावे पोलिसांना देऊन तो स्वत: तपासात मदत करत होता. काही ठिकाणी तो स्वत:च पोलिसांसोबत पत्नीचा शोध घेण्यासाठी गेला. आरोपी इंप्रो प्रा. लि. मरकळ येथे कंपनीत मजुरी करत होता तर पत्नी गृहीणी होती. ज्या दिवशी आरोपीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली, त्या दिवशी तो दिवसभर कामावर हजर असल्याचे कंपनीच्या गेटवर नोंदवलेल्या रेकॉर्डवरुन दिसून आले. आरोपीने त्याचा मोबाईल 15 दिवसांपासून बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे मिसींग महीलेचा शोध घेण्याचे पोलिसांचे सर्व प्रयत्न फोल ठरत होते.

संशय येऊ नये म्हणून खबरदारी

आरोपीने ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे त्याच्यावर संशयाची सुई येवू नये याची पुरेपूर खबरदारी घेतली होती. पोलिसांनी पती अमोलसिंग जाधव यालाच वारंवार तपासासाठी बोलवले. प्रत्येक वेळी तपासामध्ये त्याच्या बोलण्यात थोडी थोडी विसंगती येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला.

खून करुन मृतदेह फेकला खोल दरीत

अखेर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. 28 ऑक्टोबर 2023 रोजी पत्नीला मांढरदेवी येथे दर्शनासाठी जायचे असल्याचे सांगून तिला मांढरदेवी येथे घेऊन गेला. दर्शनासाठी जात असताना घाटात कार चालकाला मंदिराजवळील पार्कींगमध्ये कार लावून तिथेच थांबवण्यास सांगून ते दोघे घाटातून मंदिराच्या दिशेने पायी चालत गेले. चालत जात असताना रस्त्यात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने पत्नी ललिता हिला उतारावरुन दरीत ढकलून दिले. मात्र, पत्नी 20 फूट अंतरावर असलेल्या झाडाझुडपात अडकली. आरोपीने खाली उतरून झाडाझुडपात अडकलेल्या पत्नीचा साडीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरवा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह डोंगर उतारावरुन ढकलून दिला.

पोलिसांच्या हाती लागला सांगाडा

लोणीकंद पोलिसांनी मांढरदेवी घाटात सुमारे 200 ते 250 फूट खोल दरीत उतरुन शोध घेतला. अडीच महिन्यांपूर्वी मृत्यू झाला असल्याने पोलिसांना तिथे केवळ सांगाडा, तिची चप्पल, साडी व बांगड्या मिळाल्या. या सांगाड्याचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

घटस्फोट देत नसल्याने केला खून

पत्नी वयाने 12 वर्षांनी मोठी असल्याने तसेच घरच्यांच्या व नातेवाईक यांच्या दबावामुळे
मयत ललिता हिच्यासोबत लग्न करावे लागले होते. तसेच ती थोडी मंदबुद्धी आहे.
त्यामुळे आरोपीने तिला घटस्फोट देण्याचा प्रयत्न केला.
मात्र ललिता आरोपीला घटस्फोट देण्यास तयार नव्हती. याच कारणावरून आरोपीने
पत्नीला संपवण्याचा प्लान केला.
आरोपीने अत्यंत थंड डोक्याने व नियोजनबद्ध पद्धतीने पत्नीचा काटा काढला.
मात्र, अडीच महिन्यानंतर का होईना कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचले.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे,
तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर,
पोलीस अंमलदार प्रकाश आव्हाळे, स्वप्निल जाधव, अजित फरांदे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMPML News | पीएमपीएमएलच्या 1900 बदली कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करणार !

ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबध्द; पुरोहित वर्गाने अटल पेन्शनचा लाभ घ्यावा!