Pune : खाजगी रुग्णालयातील बेडस् ताब्यात घेण्यासाठी महापालिका आयुक्त स्वत: फिल्डवर ! 2 रुग्णालयातील 50 बेडस् तातडीने घेतले ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात रुग्णसंख्या वाढत असताना उपचारासाठी बेडस्ची संख्या वाढविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. आज तर चक्क महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दोन खाजगी रुग्णालयांची व्हिजीट करून तत्काळ ५० बेडस् ताब्यात घेण्याची प्रक्रिया पार पाडली.

शहरातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. सुमारे ५ हजार रुग्ण ऑक्सीजनवर तर एक हजारांहून अधिक रुग्ण व्हेंटीलेटवर आहेत. यासोबतच होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची प्रकृति खालावल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची मागणीही वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने सीओईपी जंबो रुग्णालयामध्ये ६२५ रुग्णांवर उपचाराची सुविधा निर्माण केली आहे. ईएसआय हॉस्पीटलसह लष्कराच्या रुग्णालयातील बेडसही ताब्यात घेतले आहेत. यासोबतच खाजगी रुग्णालयांतील बेडस्ही ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने राबविली जात आहे. आजमितीला शहरातील जवळपास साडेसात हजारांहून अधिक बेडस्वर कोव्हीड रुग्णांवर उपचार सुरू असून यामध्ये जिल्ह्यातून व बाहेरून येणार्‍या रुग्णांची संख्याही अधिक आहे. सौम्य लक्षणे असलेल्या परंतू विलगीकरणाची सुविधा नसलेल्या नागरिकांसाठीही चार विलगीकरण कक्षांमध्ये साडेबारांशेहून अधिक बेडस्ची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे.

मात्र, रुग्णवाढीचा आणि त्यातही गंभीर रुग्ण वाढीचा दर पाहाता महापालिकेने खाजगी रुग्णालयातील अधिकाअधिक बेडस् उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोव्हीडसाठी अतिरिक्त बेडस् उपलब्ध करून देण्यास खालील अधिकार्‍यांना दाद न देणार्‍या खाजगी रुग्णालयांना अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल भेट देउन बेड ताब्यात घेत आहेत. तर आयुक्त विक्रम कुमार यांनी आज खराडी एशिया कोलंबिया आणि औंध येथील मेडीपॉईंट रुग्णालयाला भेट देउन तेथील ५० हून अधिक बेडस् तातडीने ताब्यात घेतले. या दोन्ही ठिकाणी सुमारे ५० ऑक्सीजन बेडस् असून त्यापैकी पाच ते सहा व्हेंटीलेटर बेडस आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.