Pune News : 3 वर्षांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, विवाहितेच्या कुटुंबीयांना मिळणार 62 लाखांची नुकसान भरपाई; उपचारांसाठी आला होता 50 लाख खर्च

पुणे : देव दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या कारचा अपघात झाला. त्यावेळी आलेल्या आजारपणातून बरे होण्यासाठी विवाहितेने तीन वर्ष लढा दिला. मात्र तिची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. अपघातानंतर दगावलेल्या पत्नीबाबत नुकसान भरपाई मिळण्यासाठी पतीने दावा दाखल केला. तो समुपदेशनाद्वारे निकाली काढत पतीला ६२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य केले.

स्नेहल गणेश धुमाळ असे अपघाती मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. स्नेहल या पदवीचे शिक्षण घेत होत्या. शेजारी राहणाऱ्यांबरोबर त्या ४ एप्रिल २०१५ रोजी अक्कलकोट येथे देव दर्शनाला गेल्या होत्या. प्रवासादरम्यान एका वळणावर त्यांची कार पलटली. या अपघातात स्नेहल यांना गंभीर दुखापत झाली होती. तसेच अर्धांगवायूचा झटका देखील आला होता. सुरवातीला त्यांना सोलापूर येथील एका रुग्णालयात उपचार देण्यात आले. त्यानंतर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तीन वर्षे त्यांच्यावर उपचार सुरू होता. मात्र २३ मार्च २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. तीन वर्ष सुरू असलेल्या उपचारांसाठी ५० लाख रुपये खर्च आला होता.

याबाबत पतीने कार मालक आणि विमा कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स विरोधात मोटार अपघात न्याय प्राधिकरणात दावा दाखल करत ८० लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली. जिल्हा न्यायाधीश एस. एन. सोनवणे यांनी हे प्रकरण समुपदेशानासाठी ॲड. अतुल गुंजाळ यांच्याकडे पाठविले. ॲड. गुंजाळ यांनी दोनदा समुपदेशन केल्यानंतर हे प्रकरण निकाली निघाले. अर्जदारांकडून ॲड. एस. जी. जोगवडीकर यांनी तर विमा कंपनीच्या वतीने ॲड. सुनील द्रविड यांनी काम पाहिले.