Pune News : पिस्तुलांची खरेदी-विक्री करणार्‍यांचा खंडणी विरोधी पथकाकडून पर्दाफाश, 8 पिस्तुलांसह 15 काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात पिस्टलची विक्री करणाऱ्या मुख्य आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी पिस्टलची विक्री करणाऱ्या मुख्य आरोपीसह चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 पिस्टल, 15 जिवंत काडसुसांसह 4 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भूषण महेश मराठे (वय-23 रा. अरुणनगर, ता. चोपडा, जि. जळगाव) असे पिस्टल विक्री करणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने विक्री केलेल्या तीघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने राहुल चंद्रकांत पवार (वय-26 रा. नसरापूर, ता. भोर), तौफीक गुलाब शेख (वय-25 रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर, पुणे), राम गोरोबा जाधव (वय-35 रा. दांडेकर पुल) यांना पिस्टलची विक्री केली असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

खंडणी विरोधी पथकाला जळगाव येथून पिस्टल विक्री करण्यासाठी एक इसम रेल्वे स्टेशन परिसरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी स्टेशन परिसरात सापळा रचून भूषण मराठे याला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे तीन पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे आढळून आली.

भूषण मराठे याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने राहुल पवार, तौफीक शेख, राम जाधव यांना पिस्टल विक्री केल्याची माहिती दिली. पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्यकाडून चार पिस्टल नऊ काडतुसे जप्त केली. राहुल पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर रायगड पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून 2 पिस्टल आणि चार काडतुसं जप्त केली. तर राम जाधव याच्यावर रायगड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून त्याच्याकडून 1 पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त केली आहे. याशिवाय तौफीक शेख याच्याकडून 1 पिस्टल,1 गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींवर
बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदार्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढऱे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार संपत अवचरे, प्रदिप शितोळे, विनोद साळूंके, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, विजय गुरव, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, प्रदिप गाडे, अमोल पिलाने, भूषण शेलार, शैलेश सुर्वे, मोहन येलपल्ले, महिला पोलीस अंमलदार रुपाली कर्णवार, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.