Pune News : पीएमपी बसमध्ये तिकीट काढण्यास सांगितल्यावरून वाहकास मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – स्वारगेट ते धनकवडी पीएमपी बसमध्ये बसलेल्या व्यक्तीला तिकीट काढण्यास सांगितले म्हणून त्याने वाहकाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

याप्रकरणी प्रवीण भाऊसाहेब रणदिवे (वय ५५, रा. धनकवडी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुनिल पेठकर (वय ४५, रा. आंबेगाव बु.) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पेठकर हे पीएमपीत वाहक म्हणून काम करतात. मंगळवारी सायंकाळी ते स्वारगेट ते धनकवडी या बसमध्ये नेमणुकीला होते. स्वारगेटवरून बस निघाल्यानंतर पुढील दरवाजापासून प्रवाशांची तिकेटे काढत मागील दरवाजापर्यंत गेले. त्यावेळी आरोपी हा सीटवर बसलेला होता. त्याला पेठकर यांनी तिकीट काढण्यास सांगितले. त्यावेळी त्याने तिकीट काढल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांन त्याला तिकीट दाखविण्यास सांगितले. त्याने तिकीट दाखविले असता ते जुने असल्याचे आढळून आले. त्यांनी त्याला हे तिकीट जुने असून नवीन तिकीट काढण्यास सांगितले. त्याचा रणदिवे याला राग आला. त्याने पेठकर यांना शिवीगाळ सुरू केली. तसेच, त्यांना हाताने मारहाण करून धमकाविले. त्यांच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक किरण मदने करत आहेत.