Pune News : 45 कोटी रुपयांचा GST अपहार; व्यावसायिक देवेन मेहता यांचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे (Pune) : तब्बल ४५ कोटी रुपयांच्या जीएसटीचा अपहार केल्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार मुंबई येथील व्यावसायिक देवेन मेहता याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायाधीश विनय यावलकर यांनी हा आदेश दिला. या गुन्ह्यामध्ये डीजीजीआई खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुप्तचर अधिकारी अजित कुमार यांनी तत्वर कारवाई करून आरोपीस अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली होती. मेहता याने जामिनावर मुक्तता होण्यासाठी जामीन अर्ज दाखल केला होता.

जीएसटी खात्याच्यावतीने विशेष सरकारी वकील ॲड. संदीप घाटे यांनी मेहता यांच्या जामिनास विरोध केला. संबंधित गुन्हा आरोपीने केला नाही व आरोपीचा या गुन्ह्याशी संबंध नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वतीने करण्यात आला होता. आरोपीने त्यांच्या मुंबईमधील दोन सदनिकांची विक्री करून अपराहाची रक्कम देण्याची तयारी दर्शविली. त्याबाबतचे हमीपत्रही न्यायालयात सादर केले.

ॲड. घाटे यांनी जामीनावर हरकत घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचे दाखले दिले. जीएसटी आयुक्तांना अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये कलम ६९ अन्वये आरोपींना अटक करण्याचे आदेश देण्याचे पूर्ण अधिकार आहेत. तसेच अटक करण्यापूर्वी मूल्यांकन करण्याची आवश्यकता नाही. हा गुन्हा देशाची आर्थिक परिस्तिथी खिळखिळी करणारा आहे. अशा प्रकारच्या गंभीर आर्थिक गुन्यामध्ये जामीन देण्यात येऊ नये, असाही युक्तिवाद ॲड. घाटे यांनी केला.

न्यायालयाने ॲड. घाटे यांचा युक्तिवाद मान्य करून मेहता याचा जामीन अर्ज फेटाळला.