Pune News : खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे नगरसेवक मनिष आनंद यांच्यासह 7 जणांविरूध्द खुनाचा प्रयत्न, विनयभंगाच्या कलमान्वये FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या ‘त्या’ मारहाण प्रकरणात आता न्यायालयाच्या आदेशाने ‘खडकी कॉन्टॅमेंट’चे नगरसेवक मनीष आनंद यांच्यासह 7 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा व विनयभंग आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्या सोबत असणाऱ्या 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अमन चड्डा, करण चड्डा, ममता चड्डा, अजय चड्डा, मनीष आनंद, मोटारसायकलवर असलेले दोन अनोळखी व्यक्ती व गर्दीत असणारा एक अशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी 14 डिसेंबर रोजी औंध येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे कार पार्क केली होती. त्यावेळी त्यांनी कारचा दरवाजा उघडला असता पाठीमागून जाणूनबुजून ममता चड्डा व अजय चड्डा यांनी धडक देऊन आरडाओरडा केला व त्यांना शिवीगाळ करत फिर्यादी यांचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार झाल्यानंतर फिर्यादी हे तेथून त्यांचे सहकारी हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत औंध चौकात आले असता आरोपींनी त्यांची कार दुचाकी आडवी लावून थांबवली. तसेच जाधव यांना खाली ओडून मारहाण करत शिवीगाळ केली. त्यांना रॉडने बेदम मारहाण केल्याचे म्हटले आहे. तर फिर्यादी यांना आरोपींनी या गोंधळात घेऊन कारमध्ये बसवले तसेच आरोपी मनीष आनंद व अमन आणि करण यांनी त्यांच्यावर गाडीत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना मारहाण करून त्यांचा आयफोन तोडला तसेच कारचे नुकसान केले असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान हा प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी प्रथम हर्षवर्धन जाधव व फिर्यादी यांच्यावर जेष्ठ नागरिकाला मारहाण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी फिर्यादी यांनी तक्रार केली होती. मात्र, त्यात पोलिसांनी कारवाई केली नाही. यानंतर फिर्यादी यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आता गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे.