अरे देवा ! आळंदीत नवजात अर्भक सापडल्यानं प्रचंड खळबळ

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन –  येथील काटेवस्ती परिसरात असलेल्या डोंगरावर आज (शनिवारी) पहाटेच्या अंधारात नुकतेच जन्मलेल्या स्त्री जातीचे अर्भक पिशवीत टाकून झाला अडकवलेल्या स्थितीत आढळून आले. पहाटे फिरण्यासाठी आलेल्या महिलांना हा प्रकार दिसून आला.

त्यानंतर, थंडीने गारठून गेलेले हे बाळ मायेने जवळ घेत या महिलांनी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या आपल्या घरी नेले. उबदारपणा आणि मायेचा हात गोंजारल्यावर त्या बाळाची कळी फुलून आली. हे बाळ नुकतेच जन्मले असून, बाळाची नाळ तशी अंगावर गुंडाळून ठेवली होती. पिशवीत अडकून ठेवल्याने बाळ वाचले, अन्यथा डोंगरावरील कुत्र्यांचे ते भक्ष्य ठरले असते.

शिवसेनेचे ॲड. कुणाल तापकीर व स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सदर बाबीची माहिती देत बाळाला पोलिसांकडे सुपूर्द केले. याबाबत बोलताना दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे म्हणाले, या स्त्री अर्भकाला रीतसर प्रक्रिया करुन, रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अर्भक टाकणाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, परिसरातील एका कुटूंबाने मुलीला स्वीकारण्याची तयारी दर्शवली असल्याने मुलीला आधार मिळाला असला तरी, सरकारी प्रक्रिया व जटील नियमांमुळे ही शक्यता धूसर आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.