Pune News : पर्वती येथील जमीन प्रकरणी रवींद्र बऱ्हाटे, संजय भोकरे, देवेंद्र जैन, शैलेश जगताप, प्रेमचंद बाफना याच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्यासह 2 पत्रकार, बडतर्फ पोलीस आणि इतरांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पर्वती येथील एका वादात असलेल्या जमिनीचे गैरव्यवहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात निलमणी धैर्यशिल देसाई (रा. सोमेश्वरवाडी पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, संजय भोकरे (रा.सांगली), परवेझ जमादार, पत्रकार देवेंद्र जैन, जयेश जगताप, प्रशांत जोशी, प्रकाश फाले, विशाल तोत्रे, प्रेमचंद रतनचंद बाफना, प्रशांत बाफना, विनय मुंदरा, हरिष किरण बाफना, राजकीरण बाफना अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर  खंडणी, फसवणूक, अपहार करणे, संगणमत करून गुन्ह्याचा कट रचल्याच्या आरोपावरून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापुर्वी बऱ्हाटे व त्याच्या  साथीदारावर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. सध्या बऱ्हाटेसह दोघे फरार आहेत.

पर्वती येथील जमीन निलमली देसाई यांच्या वडिलांनी जावई धैर्यशील देसाई यांच्या नावावर केली होती. त्यातील काही जागा विकसित केल्यानंतर धैर्यशील यांच्याकडे ४ हजार ९१३ स्क्वेअर मीटर जागा शिल्लक राहिली होती. धैर्यशील देसाई यांच्या नावावरील उरलेली जागा तुमच्या नावावर करुन देतो, असे प्रशांत जोशी यांनी नीलमणी यांना सांगितले. त्याशिवाय प्रशांत जोशी याने त्यांच्याकडे शैलेश जगताप, जयेश जगताप जमीन विकत घेण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. संबंधित जमिनीवर तुमच्या पतीच्या वारसांची नावे रवींद्र बऱ्हाटे

लावून देणार असल्याचे आरोपींनी नीलमणीला सांगितले.

शैलेश जगताप याने नीलमणीला ऋषिकेश बारटक्के यांना जागा विका असे सांगितल्यावर त्यांच्याबरोबर ५ कोटी रुपयांचा जमिनीचा व्यवहार ठरला. बारटक्के याने निलमणी देसाई व त्यांच्या मुलीच्या नावावर प्रत्येकी ५ लाख रुपये जमा केले. त्यानंतर शैलेश जगताप व इतरांनी बारटक्के याला धमकावून 20 लाख रुपये घेतले. जमिनीची मोजणी होऊन देणार नाही, अशी धमकी देऊन पैशाची मागणी केली. मोजणीच्या नावाखाली संजय भोकरे, शैलेश जगताप, प्रशांत जोशी व इतरांनी खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देऊन व मारण्याची धमकी देऊन 40 लाख रुपये आरटीजीएसद्वारे तर 10 लाख रुपये रोख स्वरुपात घेतल्याचे ऋषिकेश बारटक्के यांनी सांगितले. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.