पुरंदर : वाढदिवसाच्या दिवशीच शाळकरी मुलीची आत्महत्या

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन  – शिवानी जालिंदर लिंभोरे या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील शिवरी या ठिकाणी घडली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
जेजुरी पोलीस स्टेशनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जालिंदर सर्जेराव लिंभोरे हे शेतातील काम करून घरी आले, तेव्हा त्यांना मयत शिवानी हिने घरातील अँगलला साडीने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी भाऊ सोपान लिंभोरे व इतर लोकांच्या मदतीने तिला खाली उतरवण्यात आले. त्यानंतर तिला जेजुरी येथील सरकारी दवाखान्यात नेले असता, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

शिवानी ही येथील महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. शनिवारी तिचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ही घटना घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महादेव कुतवळ यांच्याकडून करण्यात येत आहे.