रेखा जरे हत्याकांड : खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, रुणाल जरे यांची मागणी

अहमदनगर: पोलसीनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे (rekha jare murder case ) यांच्या खून प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, तसेच या खटल्यात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी सरकारकडे केली आहे.

रुणाल जरे यांनी त्यांचे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांच्या मार्फत पोलिस अधीक्षकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व संबंधितांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. यात जरे यांनी म्हटले आहे की, या गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक झाली आहे. मात्र, मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्याप फरार आहे. त्याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. तरीही तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. यामुळे तपास रेंगाळला असून संशयाला वाव मिळत आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी बोठे याचा इतिहास थक्क करणारा आहे. त्याचा मोबाइल जप्त केला असून त्यातून बरेच पुरावे पोलिसांना मिळणार आहेत. अशा परिस्थितीत या खटल्याची लवकरात लवकर सुनावणी होऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आरोपींना कठोर शिक्षणा होण्यासाठी या खटल्यासाठी निकम किंवा यादव यांची नियुक्ती करावी. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आम्हाला लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.