पशु संवर्धन विभाग दूध उत्पादनासह ग्रामीण अर्थव्यवस्था लवकरच सक्षम करणार, ‘या’ प्रकल्पावर काम सुरू; पशु संवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती

पुणे/उरुळी कांचन : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्याच्या पशु संवर्धन विभागाच्या माध्यमातून दिवसाला 20 लिटर दूध देणारी गीर जातीची गाय आणि 10 ते 12 लिटर दूध देणारी सानेन जातीची शेळी विकसित करण्याचे काम मार्च 2021 पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या कामात उरुळी कांचन (ता. हवेली) येथील (बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान) संस्थेचीही मदत घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात दूध उत्पादन वाढण्यासह ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे, असे मत राज्याचे पशु संवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार (Animal Husbandry and Sports Minister Sunil Kedar) यांनी येथे व्यक्त केलंय.

महाराष्ट्र राज्याचे पशू संवर्धन आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आमदार अशोक पवार यांच्यासमवेत शुक्रवारी सायंकाळी उरुळी कांचन येथील बायफ या संस्थेला भेट दिलीय. या भेटीत केदार यांनी बायफ संस्थेकडून गीर गाय आणि सानेन शेळीवर करण्यात येत असलेल्या संशोधनाबाबत माहिती घेतलीय.

यावेळी आमदार अशोक पवार, पशुधन विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. धनंजय परकाळे, बायफचे अध्यक्ष डॉ. गिरीष सोहनी, वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक पांडे, उपाध्यक्ष व्ही. वाय. देशपांडे, डॉ. जयंत खडसे, डॉ. स्वामीनाथन, कर्नल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी सुनील केदार म्हणाले, ब्राझील या देशाने 20 वर्षापूर्वी आपल्या देशातून गीर गायी नेल्या. या काळात ब्राझील या देशातील संशोधकांनी गीर गाईवर वेगवेगळे प्रयोग करुन तिचे दूध प्रतिदिन 20 लिटरवर नेले. ब्राझील या देशाने विकसित केलेली आणि दिवसाला 20 लिटर दूध देणारी गीर जातीची गाय राज्यात आणून आपल्याकडेही पशुधन विकास महामंडळांच्या माध्यमातून मागील काही महिन्यांपासुन संशोधन सुरुय.

तसेच सानेन प्रजातीची शेळी सध्या कॅनडा देशात प्रसिध्द आहे. ही शेळी आपल्या राज्यातील वातावरणात टिकणार आहे, असे संशोधनातून पुढे आलंय. राज्यात पशुधन विकास महामंडळांच्या माध्यमातून या शेळीचे उत्पादन करण्याबाबत संशोधन सुरुय. ही शेळी आपल्या राज्यात आल्यास ग्रामीण भागातील शेतकरी सक्षम होईल. त्यामुळे दूध उत्पादनासह ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी पशुधन विकास महामंडळ आणि बायफ संस्था एकत्र काम करणार आहेत.