Sangli News : शिराळा तालुक्यातील इंटरनेट सेवा खंडित, रेंजसाठी व्यापाऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन

शिराळा (सांगली ): पोलीसनामा ऑनलाइन – सांगलीतील (Sangli ) शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील इंटरनेट सुविधा (Internet service disconnected) गेल्या दोन महिन्यापासून वारंवार खंडित होत असल्याच्या कारणावरुन शेडगेवाडी या गावातील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले आहे. त्या परिसरात सर्व कंपनींचे स्वतःचे मोबाइल टॉवर असूनही रेंज येत नाही. यामुळे खरेदी-विक्री व्यवहार सुरळीत होत नसल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

इंटरनेट रेंजची समस्या निर्माण झाल्यामुळे तेथील व्यापाऱ्यांचा कुठेही कसलाही संपर्क होत नाही. इंटरनेट रेंज मोबाईलवर येण्यासाठी व्यापाऱ्यांना दुकान सोडून ऊंच ठिकाणी, जिथे रेंज आहे तिथे जाऊन फोन लावावे लागत होते. याबरोबरच शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अभ्यास, शासकीय कामे, बँकेची कामे रखडत आहेत. याकारणामुळे मनसे तालुका अध्यक्ष संजय पाटील, बाजीराव शेडगे, मनोज चिंचोलकर, दिनकर शेडगे, तानाजी नाठुलकर,विकास शेडगे, संजय कोठावळे,बाबा गोळे यांच्यासह व्यापाऱ्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन केले.