दिवे येथील आरटीओकडून वाहनांच्या पासिंगसाठी सॅनिटायझर मारून 50 ते 100 रूपयांची वसुली

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  दिवे (ता. पुरंदर) येथील आरटीओकडून तीनचाकी व चारचाकी वाहनांच्या पासिंगसाठी सॅनिटायझर मारून 50 ते 100 रुपये अनधिकृतपणे घेतले जात असून, याबाबत पुणे उपप्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसून, माहिती अधिकारात माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते वाजिद खान यांनी निवेदनाद्वारे मुंबई प्रादेशिक परिहवन आयुक्त कार्यालयाकडे केली आहे.

वाजिद खान म्हणाले की, पुणे शहरातील आरटीओच्या अखत्यारितील दिवे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील आरटीओ येथे तीन चाकी व चारचाकी वाहनांच्या पासिंगसाठी सॅनिटायझर मारुन तीन चाकी वाहनांकडून ५० रुपये, तर चारचाकी वाहनाकडून १०० रुपये घेतले जातात. याबाबतचे व्हीडिओ चित्रीकरण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजिव भोर व प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना दाखविले, यावेळी त्यांनी त्याला परवानगी नसल्याचे सांगितले. तसेच, संबंधितावर त्वरित (दि.१२/८/२०२०) आरटीओच्या नावाने सॅनिटायझरच्या नावाखाली लाखों रुपयांची लूट करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार केली होती. मात्र, चार महिन्यांहून अधिक कालावधी लोटला तरी संबंधितांवर कोणतीही कारवाई केली गेली नाही. तसेच माहिती अधिकारात माहिती मागितली असता पुणे आरटीओकडून टोलवाटोलवी करुन माहिती अधिकार कायद्यालाही केराची टोपली दाखवली जात आहे, वाजिद खान संस्थापक अध्यक्ष अँटी करप्शन स्कॉड यांनी असेही निवेदनामध्ये म्हटले आहे.